लोकवस्ती नसलेल्या जागेत रस्त्यासाठी 1.23 कोटींचा खर्च
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
विक्रमगड: येथील नगरपंचायत क्षेत्रातील वेहेलपाडा रोड या भागात वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून करण्यात आलेला सिमेंट काँक्रीट मार्गावर बेसुमार पैशाची उधळपट्टी करण्यात आली असून हा मार्ग खाजगी जागेत बेकायदेशीरपणे केल्याने सरकारी पैशाचा अपव्यय झाल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पडवळे यांनी केली आहे.
विक्रमगड नगरपंचायत हद्दीत वेहेलपाडा मेनरोड ते कौशल्य विकास केंद्र या टप्प्यात सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जवळपास 300 मीटर अंतराच्या या मार्गासाठी तब्बल 1 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर असून लकी कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास हे काम देण्यात आल्याची माहिती आहे. हे काम करतांना ते सार्वजनिक जागेत व सार्वजनिक हिताचे, सर्व समावेशक व नागरिकांच्या सोई सुविधांमध्ये भर पाडणारे असावे अशी अट योजनेत आहे. यानुसार मुख्याधिकारी यांनी काँक्रीटीकरण सुरू असलेल्या जागा मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र बनविण्यात आल्याचे सांगून काम सुरू करण्याची परवानगी दिली.
सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण पडवळे यांनी काँक्रीटीकरण रस्त्याबाबत मागविलेल्या माहितीत जागा मालकाचे कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र आढळले नसल्याने करण्यात आलेले काम हे बेकायदेशीर असल्याचा आरोप पडवळे यांनी केला आहे. मुळात करोडो रुपयांचे काम करतांना ते जनतेच्या वापरात येणे आवश्यक आहे मात्र रस्ता बनविलेल्या जागी कोणतीही लोकवस्ती नसल्याने हा रस्ता नेमका कुणासाठी बनविण्यात आला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विक्रमगड नगरपंचायतला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आलेल्या पैशांमधून नेमकी कोणती विकासकामे करण्यात आली आहेत याची चौकशी वरिष्ठ पातळीवर करून सिमेंट काँक्रीटीकरणाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत नगरपंचायत मुख्याधिकारी सुरेश कामडी यांना कार्यालयात जाऊन विचारणा केली असता मी याबाबत काय बोलू असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले तर शहर अभियंता प्रेमचंद मिश्रा यांना संपर्क केला असता त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही.
◾ 1.23 कोटी रस्त्याची गरज या भागात नसतांनाही हे काम का करण्यात आले शिवाय अभियंत्यांनी केलेला ट्राफिक सर्व्हे कोणत्या आधारे केला आहे ? नगरपंचायत क्षेत्रात बहुतांश कामे ही काँक्रीटीकरणाची असून जनतेला फक्त काँक्रीटीकरण रस्तेच आवश्यक आहेत का ? शिवाय सगळी कामे एका विशिष्ट ठेकेदाराला देण्यात आल्याने या सगळ्या कामांची सखोल चौकशी व्हायला हवी.
— लक्ष्मण पडवळे, सामाजिक कार्यकर्ते ,विक्रमगड