मेंढवन खिंडीच्या वळणावर अपघात ग्रस्त टेम्पो पंधरा तासांनी रस्त्यावरून हटवला.
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अपघात ग्रस्त वाहने रस्त्यावरून हटविण्याच्या कामात महामार्गाच्या ठेकेदार कंपनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मंगळवारी (ता.22)रात्री बारा वाजताच्या सुमारास मेंढवन खिंडीच्या उतारावरील वळणावर वाडा खडकोना गावच्या हद्दीत भरधाव टेम्पोने पुलाच्या कठड्याला धडक दिल्याने अपघात झाला होता. अपघातात चालक किरकोळ जखमी झाला होता. परंतु अपघात ग्रस्त टेम्पो महामार्गाच्या तिसऱ्या मार्गिकेवर पडून असल्याने एक मार्गिका बंद झाली होती. अपघात ग्रस्त टेम्पोला धडकून अपघात होण्याची शक्यता असताना सुमारे पंधरा तास टेम्पो रस्त्यावर होता.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदार वागणुकीविरोधात संताप व्यक्त केला आहे.
अपघातग्रस्त वाहनाला दुसरे वाहन धडकून अपघात होऊ नये तसेच वाहनचालक आणि प्रवाश्यांचा जीविताचे रक्षण करण्यासाठी अपघातानंतर तासाभरात अपघात ग्रस्त वाहन रस्त्यावरून हटविण्याचे राष्टीय महामार्ग प्राधिकरणाचे आदेश आहेत.परंतु महामार्ग प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी महामार्गाच्या ठेकेदार कंपनी केली जात नाही.त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने ठेकेदार कंपनीच्या पेट्रोलिंग कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.