◾ कोलवडे कचराभुमीत औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक घनकचरा व टाकावु रसायनाची विल्हेवाट लावली जात असल्याचा प्रकार समोर
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर मधील केमिकल माफियां रासायनिक घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नवनवीन युक्त्या करताना दिसत आहे. रासायनिक घनकचरा व टाकाऊ रसायन कचराभुमीत फेकले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. बोईसर, सरावली येथील भागातील संपूर्ण कचरा कोलवडे येथील कचराभुमीत विल्हेवाट लावण्यासाठी आणला जातो. याच ठिकाणी असलेल्या निर्जन स्थळी स्थानिकांना हाताशी घेवून काही केमिकल माफिया या कचराभुमीत रासायनिक घातक कचऱ्याची विल्हेवाट लावताना दिसून येतात. मात्र याठिकाणी सुरक्षा रक्षक असताना ग्रामपंचायत बाहेरील इतर घातक कचरा येतो तरी कसा असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
कोलवडे येथे येणाऱ्या खारटण असलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारचे कचराव्यवस्थापन करता येत नसताना देखील याठिकाणी नियमांना डावळून बेकायदेशीर कचराभुमीत उभारली आहे. आता याच कचराभुमीत कारखान्यातील केमिकल युक्त प्लॅस्टिक, टाकावु रसायन व घातक रासायनिक घनकचऱ्याची देखील विल्हेवाट लावली जात आहे. याठिकाणी कोलवडे, सालवड, खैरापाडा, बोईसर व सरावली ग्रामपंचायतीचा कचरा टाकला जात आहे. ज्याठिकाणी कचरा टाकला जातो त्याच ठिकाणी नैसर्गिक नाला असून हा नाला पुढे जाऊन खाडीला मिळतो. हा संपूर्ण भाग खारटण भाग असून येथे टाकलेल्या कचऱ्या मुळे खाडी भागाचे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. असे असले तरी संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
तारापूर औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे येथील कचराभुमीत काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात रासायनिक घनकचरा टाकल्याचे आढळून आले होते. याठिकाणी पिवळ्या रंगाचे रासायन टाकले असल्याचे पाहावयास मिळत असून तो रासायनिक घनकचरा त्याठीकाणाहुन हटविण्यात आला आहे. यामुळे मोठ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली औद्योगिक क्षेत्रातील कचरा गाडला जात असल्याचा शक्यता नाकारता येत नाही. यामुळे येथील जागेवर बेकायदेशीर पणे उभारले कचराभुमी बंद करण्याची मागणी देखील नागरिकांन कडून केली जात आहे. इतर ग्रामपंचायत वाहनातून येणाऱ्या कचऱ्यात काही कारखानदार आपला कचरा टाकत असल्याचे दिसून आले होते. यातच ग्रामपंचायत वाहन याठिकाणी तपासले जात नसल्याने रासायनिक घनकचरा विल्हेवाट लावणाऱ्यांचे फावत चालले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खाडीचे प्रदूषण व येथील खारटण जागेवर उभारलेल्या कचराभुमीची तपासणी करून ती तातडीने बंद करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींन कडून केली जात आहे.
◾खारटण भाग असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून हा कचरा पेटवून दिला जातो. यातच काही कचरा जेसीबी च्या सहाय्याने पसरवला जातो. पावसाळ्यात हा कचरा वाहुन खाडी मार्गे समुद्रात जात असतो. या खारटण भागात मोठ्या प्रमाणात पुर्वी कांदळवन क्षेत्र होते. मात्र हळूहळू हे क्षेत्र नष्ट होत चालले असताना देखील प्रशासन याकडे डोळेझाक करत कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचे आजवर दिसून आले आहे. परिणामी येथील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
◾कोलवडे कचराभुमीत वाँचमन ठेवण्यात आला असून याठिकाणी आता कोणत्याही प्रकारचा रासायनिक घनकचरा येत नाही. याबाबत खात्री केली जात असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाँचमन याठिकाणी असतो. तसेच मुख्य गेटला टाळे लावले जाते.
— नितीन मोकाशी, ग्रामविकास अधिकारी कोलवडे