सोयीसुविधा अभावी अनेक आदिवासी पाड्यांतील नागरिक भोगतात मरणयातना
पालघर दर्पण: रमेश पाटील
वाडा: डिजिटल भारताचे स्वप्न आपण सगळेच पाहत आलो आहोत. देशाचा विकास होत असल्याचा दावा केंद्र सरकार करतेय तर राज्य सरकार महाराष्ट्र प्रगती करतोय असा दावा करतोय परंतु पालघर जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यांवर जायला रस्ता नाही, अनेक ठिकाणी प्यायला पाणी नाही तर आरोग्याच्या सुविधा मिळविण्यासाठी दहा, दहा किलोमीटर लांबीची पायपीट करावी लागत आहे. येथील नागरिकांच्या या मरणयातना कधी संपतील याचे उत्तर आजवर खात्रीशीर असे कुणीही सांगू शकत नाही.
देशाची आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी असलेल्या मुंंबईपासून 100 किमी अंतरावर वाडा, विक्रमगड जव्हार, मोखाडा या चार तालुक्यातील अनेक पाड्यांवर आजही वीज पोहोचलेली नाही. पिण्याच्या पाण्यासाठी डिसेंबर महिन्यांपासूनच येथील महिलांची तीन ते चार किलोमीटर अंतरापर्यंत पायपीट सुरु झाली आहे. तर मोखाडा तालुक्यातील दरी डोंगरात असलेल्या आसे ग्रामपंचायत अंतर्गत गुजरातच्या सीमेवर वसलेला कोल्हेधव हा आदिवासी पाडा आजही मूलभूत सोयीसुविधा पासून वंचित राहिला आहे. इथील लोकसंख्या कमी असल्याचे कारण पुढे करून इथे सोयीसुविधा दिल्या जात नाहीत, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
वाडा तालुक्यातील आखाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील भगतपाडा येथे दोनशेहून अधिक लोकसंख्या आहे. मात्र येथे जाण्यासाठी आजवर शासनाने कुठल्याही प्रकारचा रस्ता केलेला नाही. उन्हाळ्यात येथील नागरीकांना तीन ते चार किलोमीटर पायपीट करून आखाडा या महसूल गावी यावे लागते. पावसाळ्यात येथील ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदी पार करुन आजुबाजूच्या गावांमध्ये जावे लागते. सुर्यानगर ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील आमला, गारमाळ येथील ग्रामस्थांचा पावसाळ्यातील चार महिने मोखाडा, वाडा तालुक्याशी संपर्क राहत नाही. ही दोन्ही गांवे गारगाई नदीपलिकडे असल्याने नदीतील पुरपाणी कमी होत नाही तोपर्यंत या ठिकाणी येणे-जाणे थांबते. दोन महिन्यांपूर्वी आमला येथील एका गरोदर महिलेला वेळीच सुविधा न मिळाल्याने आपल्या मुलासह जीव गमवावा लागला होता.
सोयीसुविधा पुरवण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. परंतु याचा विसर येथील प्रशासन, लोकप्रतिनिधींना पडल्याचे दिसून येते. मोखाड्यातील कोल्हेधव हा पाडा तर समस्यांचा पाडा म्हणुनच ओळखला जातो. येथे वीज, पाणी, रस्ता, आरोग्य अशा कोणत्याच सुविधा नाहीत. गावातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर लाकडाची डोली करून त्या रुग्णाला आहे या गावात न्यावे लागते. या गावातही वेळीच उपचार न मिळल्याने एका मातेला व दोन मुलांना अलिकडेच जीव गमवावा लागला होता. केंद्र सरकार म्हणतेय मेक इन इंडिया, डिजिल इंडिया, घर,घर बिजली, हर घर नळसे जल. पण या योजना या आदिवासी पाड्यांपर्यंत आजपर्यंत पोहोचल्यातच नाहीत.
स्वस्त धान्यासाठी सात किमीची पायपीट
स्वातंत्र्यपूर्व काळापासून वास्तव्यास असलेल्या मोखाड्यातील कोल्हेधव या 20 हुन अधिक असलेल्या आदिवासी पाड्यावर अंगणवाडी नाही, शाळा नाही, पाण्याची सोय नाही. एवढंच काय तर रेशन दुकानावरचे धान्य आणण्यासाठी 7 किलोमीटरची डोंगर दरीतील पायवाट तुडवावी लागते.
◾प्रत्येक निवडणुकीच्या प्रचारात आजवर सर्वच राजकीय पक्षांनी आम्हाला सुविधा देण्याची आश्वासने दिली आहेत. मात्र आजवर कुठल्याही सुविधा मिळाल्या नाहीत.
— अनंता गावित, ग्रामस्थ कोल्हेधव, ता. मोखाडा