पालघर दर्पण: वार्ताहर
नालासोपारा: वसईच्या वालीव येथील गोलानी परिसरातील ए. वी. उद्योग, राजप्रभा इंडस्ट्रीमधील प्लास्टिक, पुठ्ठे, केमिकल बनवणा-या कंपनीला सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या लागलेल्या आगीत आठ औद्योगिक गाळे जळून खाक झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या औद्योगिक वसाहतीला लागूनच नागरी लोकवस्ती असून आग वेळीच आटोक्यात आणली गेली आहे. वसई विरार अग्नीशमन दलाच्या जवानांनी ५ फायर ब्रिगेड च्या गाड्या आणि ४ वाॅटर टैंकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली असल्याची माहिती मुख्य अग्नीशमन अधिकारी दिलीप पालव यांनी दिली. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले हे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले होते. या इंडस्ट्रीमध्ये एकूण ३६ गाळे आहेत. आग लागण्याचे कारण अस्पष्ट असून आग शॉर्टसर्किट मुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.