अध्यक्षपदी हर्षद पाटील, सरचिटणीसपदी वैभव पालवे तर उपाध्यक्ष पदी पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: मराठी पत्रकार परिषदेच्या पालघर जिल्हा कार्यकारिणीची मुदत संपल्याने २०२१ ते २०२३ या दोन वर्षाच्या कालावधीकरिता नव्याने कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. विद्यमान जिल्हाध्यक्ष नीरज राऊत यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारिणीची मुदत येत्या ३१ डिसेंबरला संपत असल्याने नवीन कार्यकारिणीची निवड पालघर मधील शासकीय विश्रामगृहात पार पाडलेल्या वार्षिक सभेत जाहीर करण्यात आली.
पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी झी २४ तासचे प्रतिनिधी हर्षद पाटील, सरचिटणीसपदी ए एम न्यूजचे प्रतिनिधी वैभव पालवे, जिल्हा कार्याध्यक्षपदी भगवान खैरनार, उपाध्यक्षपदी पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील, जयेश शेलार, दिनेश यादव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सह सरचिटणीस पदी जतिन कदम, खजिनदारपदी संदीप जाधव, संघटकपदी शशिकांत कासार तर कार्यकारी सदस्यपदी नितीन बोंबडे, बाबा गुंजाळ, गजानन मोहिते, संजय लांडगे यांची निवड करण्यात आली आहे.
परिषदेचे राज्य प्रतिनिधी म्हणून पालघर मित्रचे संपादक पंकज राऊत यांची निवड करण्यात आली असून सल्लागारपदी ज्येष्ठ पत्रकार पी. एम. पाटील, अच्युत पाटील, मंगेश तावडे, शरद पाटील यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. तर पालघर तालुकाध्यक्षपदी प्रमोद पाटील आणि तालुका सरचिटणीसपदी नावेद शेख यांचीही निवड करण्यात आली असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संजीव जोशी यांनी काम पाहिले आहे. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना उपस्थित पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या.