प्रत्येकाला स्वत:च्या संस्कृतीचा अभिमान असतो आणि तो असणे स्वाभाविकच आहे. असे असले तरी इतरांचा आदर करणे, ही भारतीय संस्कृतीची विशेषता आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानामध्ये केवळ भारतीयांसाठी नव्हे, तर विश्वाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली; मात्र भारतीय इतके सहिष्णु आणि उदारतावादी झाले आहेत की, इतरांच्या संस्कृतीला आदर करण्याचा प्रसार करता करता स्वत:च्या महान संस्कृतीच्या होणार्या र्हासाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. खरं तर ‘विश्वगुरु’ अशी ओळख असलेल्या देशाच्या नागरिकांनी स्वत:च्या संस्कृतीचे पालन करून त्याचे श्रेष्ठत्व जगाला दाखवून देणे, ही त्यांची खरी जबाबदारी आहे. भारतीय संस्कृती शास्त्रावर आधारित आहे. नववर्ष गुढीपाडव्याला साजरा करण्यामागेही शास्त्राधार आहे. आपली महान संस्कृती समजली, तर एकही भारतीय ३१ डिसेंबर साजर्या करण्यासारख्या लंपटतेमागे धावणार नाहीत. या लेखाद्वारे गुढीपाडवा हा नववर्षारंभामागचा शास्त्राधार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातून भारतीयांमध्ये आपल्या संस्कृतीचा अभिमान निर्माण व्हावा आणि त्यांनी त्यानुसार आचरण करावे, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना !
इंग्रजांची गुलामगिरी किती दिवस चालू ठेवणार ?
1 जानेवारी खरेतर ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ आहे. आजमितीला जगभरात ख्रिस्ती राष्ट्रे बहुसंख्य असल्याने आणि या राष्ट्रांनी जगातील बहुसंख्य देशांवर आपले अधिपत्य गाजवल्याने तेथील संस्कृतीचा पगडा जगभर पहायला मिळतो. त्यामुळे ‘1 जानेवारी हे जागतिक नववर्ष आहे’, असा अपसमज निर्माण झाला आहे; परंतु जगाच्या आराखड्यावर (नकाशावर) आज अशी अनेक राष्ट्रे आहेत, जी या पाश्चात्त्य संस्कृतीला झुगारून स्वराष्ट्राची संस्कृती जतन करून आहेत. त्यांचे नववर्ष 1 जानेवारीला चालू होत नाही. भारतीय संस्कृतीतर या सर्वांहून प्राचीन संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीनुसार नववर्षाचा आरंभ गुढीपाडव्याच्या दिवशी होतो. पृथ्वीच्या निर्मितीचा दिवसही हाच आहे. त्यामुळे समस्त भारतियांनी नववर्षाचा आरंभ गुढीपाडव्यापासून करायला हवा; परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही गोष्टीत आपण इंग्रजांच्या पारतंत्र्याचा त्याग केलेला नाही. त्यातील हा एक प्रकार आहे. आपल्याला आपल्या महान अशा संस्कृतीचा विसर पडत चालला आहे. पाश्चात्य प्रथा मानवाला नीतीहीन बनवतात, तर हिंदु संस्कृती संयमी आणि सदाचारी बनवते !
इंग्रजांचे षड्यंत्र !
इंग्रजांनी भारतावर 350 हून अधिक वर्षे राज्य केले. व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या इंग्रजांना इथल्या वैभवाने, संस्कृतीने आणि विविधतेने भूरळ घातली. भारताकडे पिढीजात असलेले वैभव लुटण्याकरिता आणि त्यावर आपला एकछत्री अंमल निर्माण करण्याकरिता येथील संस्कृतीवर घाला घातला पाहिजे आणि त्याकरिता येथील गुरुकुल पद्धती बंद करून कारकूनी पद्धत रुजवायला पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आले. आपले इप्सित साधण्याकरिता त्यांनी पुढे तशी पावले उचलली. मॅकोलेप्रणित शिक्षणप्रणाली देशात रुजू झाली. हळूहळू या शिक्षणप्रणालीने भारताच्या भावी पिढीवरील सुसंस्कार पुसायला आरंभ केला. आज इंग्रज भारतातून जाऊन ७२ वर्षे झाली तरी त्यांनी पेरलेले शिक्षणप्रणाली आपले कार्य करत आहे.
याला वर्षांरभ म्हणायचा का ?
31 डिसेंबरला निरोप देतांना आणि नवीन वर्षाचे स्वागत करतांना मद्यधुंद होऊन स्वैराचाराची परिसीमा गाठली जाते. त्यासाठी शासनाकडूनही मद्यालयांना, पब्स, क्लब आणि बार यांना विशेष सवलत दिली जाते. देशभरात लक्षावधी लीटर मद्य रिचवले जाते. याशिवाय अन्य अंमली पदार्थांचीही मोठ्या प्रमाणात विक्री होते. पाश्चात्त्यांच्या तालावर नशेत झिंगणार्या तरूण तरूणींना यावेळी आपल्या कपड्यांचेही भान रहात नाही. ज्यामुळे छेडछाड आणि विनयभंगाचे प्रकार या रात्री सर्रास घडतात. रात्री दारूच्या नशेत गाडी चालवल्यामुळे अनेक अपघात झाल्याच्या बातम्याही दुसर्या दिवशीच्या दैनिकांत वाचायला मिळतात. मुंबई, दिल्ली सारख्या शहरांमध्ये या रात्री गैरप्रकारांना उधाण आलेले असते. याला वर्षांरंभ म्हणायचे का ? पाश्चात्त्यांचे अनुकरण करून आपण आपली संस्कृती तर नष्ट करतच आहोत; परंतु आपल्या भावी पिढीवरही पाश्चात्त्य विचारसरणीचे संस्कार करून त्यांना भोगवादी समाजाचे एक सदस्यच बनवत आहोत, याचे भान भारतीयांना राहिले नाही.
गुढीपाडव्यामागील नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा !
इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, हिंदु वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष आणि सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. ‘वर्ष बारा महिन्यांचे असावे’, असे प्रथम कोणी सांगितले आणि जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्गाता ‘वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाड्मय आहे, याविषयी दुमत नाही. ‘द्वादशमासै: संवत्सर: ।’ असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे. 1 जानेवारीला वर्षारंभ का ? याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरवले आणि ते चालू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत.
निसर्ग काय सांगतो ?
ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) आणि वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेत (10:35) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक आणि आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.
ऐतिहासिक परंपरेचा वारसा !
रामाने वालीचा वध केला. राक्षसांचा आणि रावणाचा वध करून भगवान रामचंद्र अयोध्येला परत आले. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला. या दिवसापासूनच ‘शालिवाहन शक’ सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.
सृष्टीच्या निर्मितीचा दिवस !
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.
काँन्व्हेंट शाळांमधून एका बाजूला आपल्या संस्कृतीवर चालू असलेल्या आक्रमणामुळे येथील विद्यार्थी भारतीय आचार-विचारापासून दूरावत आहेत आणि दुसरीकडे आपण १ जानेवारी वर्षारंभ साजरा करून इंग्रजांने उदात्तीकरण करत आहोत. ‘म्हातारी मेल्याचे दुख: नाही, पण काळ सोकावतो’. आज आपण जर भारतीय संस्कृती सोडून पाश्चात्यांचे अंधानुकरण करत राहिलो, तर यातून आपण भावी पिढीला कोणता संदेश देत आहोत ? उद्या भावी पिढीने पाश्चात्य प्रथांचा अंगिकार करून भारतीय संस्कृतीला लाथाडले, तर त्याला उत्तरदायी कोण ? याचा खरोखरच गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. ‘आज नाही, तर कधी नाही’, हे लक्षात घ्या. उद्या याचा विचार करायला लागलात, तर वेळ हातातून निघून गेली असेल. त्यामुळे हा केवळ १ जानेवारी साजरा करण्यापुरता विषय नाही, तर हिंदूंच्या सांस्कृतिक धर्मांतरणाचा आहे. त्यामुळे या आक्रमणापासून भारतीय संस्कृतीला १ जानेवारी नववर्ष साजरे करण्याचे जोखड झुगारून द्या आणि भावी पिढीपुढे भारतीय संस्कृतीचा अंगिकार करण्याचा आदर्श ठेवा. लक्षात घ्या, हे आपले नैतिक, सामाजिक आणि धर्म कर्तव्य आहे.
संकलक : डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती
संपर्क : ९९६७६७१०२७