◾ आदर्श ग्रामसेवक होण्यासाठी बोगस कागदपत्रांची पुर्तता; मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना देखील खोटे करार व खोटे दाखवले सादर
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: गावाच्या विकासाचे नियोजन व गावाचा सेवक असलेला ग्रामसेवक आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजे गावातच राहणे बंधनकारक आहे. मात्र पालघर तालुक्यातील एकही ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाही. विशेष म्हणजे काही ठिकाणी मुख्यालयाच्या ठिकाणी राहतो अशा प्रकारे बोगस भाडेकरार करून त्यांची माहिती पंचायत समितीला दिली जाते. असाच प्रकार समोर आला असून एका ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी ग्रामसेवक यांना ग्रामसेवक मुख्यालयी राहत असल्याचा बोगस दाखला दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र राज्यातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळावा यासाठी अनेक ग्रामसेवकांनी कागदोपत्री केलेला विकास दाखविण्यास सुरूवात केली आहे. पालघर तालुक्यातील यासाठी ग्रामसेवकांनी देखील आपल्या कामाचे कागदावर दाखवलेले चित्र शासनाकडे आदर्श ग्रामसेवक साठी सादर केले जात आहे. यामध्ये ग्रामसेवक मुख्यालयी राहणे, ग्रामपंचायत दप्तर सुस्थितीत ठेवणे, कर वसुली, अतिक्रमण होऊ नये यासाठी केलेले प्रयत्न, ग्रामपंचायत सभेचे इतिवृत्त पंचायत समिती कडे सादर करणे अशा अनेक बाबींचा समावेश सादर केलेल्या कागदपत्रांन मध्ये आहे. पंचायत समिती स्थरावरून अशा कामांना गुण दिले जात असून पालघर तालुक्यात बड्या उत्पन्न असलेल्या ग्रामपंचायतींना बोगस गुण दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत एका तारापूर जिल्हा परिषद गटातील एका बड्या ग्रामपंचायतीला दिलेले बोगस गुणाचा अहवाल लोकसत्ताच्या हाती लागला आहे. यावरून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ग्रामसेवकांच्या कोणत्या दबावाखाली येऊन चुकिचे गुण देतात असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे.
पालघर तालुक्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने याबाबत अनेकदा तक्रारी नागरिकांनी करून देखील प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. यायच पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याचा विषय उपस्थित झाला होता. तरी देखील पालघर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. तक्रारी आल्यानंतर बोगस कागदपत्रे सादर करून मुख्यालयाच्या ठिकाणी राहत असल्याची बतावणी ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक करतात. प्रत्येक्षात एकही ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाही. पालघर तालुक्यात अनेक ग्रामसेवक तालुक्याच्या बाहेरून आपल्या खाजगी वाहनांनी प्रवास करून येत असून कामाच्या वेळेपेक्षा रोजच उशिरा गावातील ग्रामपंचायत मध्ये उपस्थित राहतात. काही ठिकाणी नागरिकांनी ग्रामसेवक यांना विचारणा केल्यावर पंचायत समिती मध्ये काम किंवा मिंटीग होती असे ठरलेले उत्तर मिळत असून ग्रामसेवक यांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे नागरीकांची कामे खोळंबून राहत असल्याची ओरड नेहमीच समोर येत आहे.
◾ ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहतात की नाही याबाबत विस्तार अधिकारी समक्ष जाऊन तपासणी करतील. तसेच सरपंच यांनी दिलेला ग्रामसेवक यांना दाखला याबाबत तपासणी केली जाईल.
— चंद्रशेखर जगताप, गटविकास अधिकारी पालघर