पालघर दर्पण: वार्ताहर
विक्रमगड: युवा प्रहार ग्रुपच्या सदस्यांनी सामजिक बांधीलकी जपत श्रमदानातून वाडा- विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवरून वाहत असलेल्या पिंजाळ नदीवर वनराई बंधारा बांधला आहे. यामुळे पिंजाळ नदीच्या पात्रातील पाण्याची पातळी वाढून अनेक गाव – पाड्यांमधील शेतकऱ्यांना व नागरिकांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी या पाण्याच्या फायदा होणार आहे.
पिंजाळ नदीवरील मालवाडा येथील पुला शेजारी कोल्हापुरी बंधाऱ्यांची मागणी गेली कित्येक वर्षे येथील ग्रामस्थ करत आहेत. मात्र आजपर्यंत येथे कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात दुभडी भरून वाहणारी पिंजाळ नदी उन्हाळ्यात कोरडी पडते. याची दखल घेत युवा प्रहार ग्रुपचे कमलाकर पाटील, प्रमोद पाटील, मिठाराम भोईर, सरपंच चंद्रकांत पाटील, उपसरपंच शाम भगत, मिलिंद महाकाल, रमेश जाधव,प्रविण वाघ, कैलास ठाकरे, शरद म्हसकर, गणपत गवळी, रवी मेघा यांच्यासह इतर सदस्यांनी एकत्र येत लोकसभागातून वनराई बंधारा बांधला. या बंधाऱ्याचा फायदा मालवाडा, पीक, वाकी या तीन गावांसह 8 ते 10 पाड्यांनमधील शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना होणार आहे.