◾ सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात माजली होती खळबळ; कामगार गेला असल्याचा सुरक्षा रक्षकांनी सुरवातीला केला होता दावा
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील लोखंडावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यात कामगारांचा मृतदेह आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. कामावर गेलेला इमस घरी परतला नसल्याने कामगारांचे घरचे त्याला शोधण्यासाठी कारखान्यात गेले असता त्यांना तेथील सुरक्षा रक्षकांनी हा कामगार घरी गेला असल्याची बतावणी सुरूवातीला केली होती. त्यानंतर कामगारांचे शव छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत सडलेल्या स्थितीत आढळून आले असले तरी आजूनही या प्रकरणाचे रहस्य उलघडू शकले नाही.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. विराज प्रोफाइल लि. प्लॉट नं. 75, 76 व 77 या कारखान्यात सोमवारी 4 जानेवारी रोजी दुपारी कारखान्याच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत कामगार लालसिंग बहुरा वय 45, याचा मृतदेह आढळून आला होता. लालसिंग बहुरा हा विराज कंपनीमध्ये मागील बारा वर्षापासून प्लंबरचे काम करत होता. सहा महिन्यापूर्वी त्याला कंपनी रोल वरून कमी करून साईनाथ इंटरप्राईजेस या महेश महतो याच्या ठेकेदारी मध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धती वरती कामावर ठेवण्यात आले होते. 29 डिसेंबर रोजी नेहमी प्रमाणे तो कारखान्यात कामासाठी गेला होता. परंतु त्या रात्री तो घरी परतला नसल्याने त्यांच्या घरच्यांनी 30 डिसेंबर रोज रात्री कारखान्यात चौकशी केली असता प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांने तो त्याच दुपारीच घरी निघून गेल्याने मयत कामगारांच्या घरच्यांना सांगितले होते.परंतु कामगार घरी गेलेला नसल्याने कारखान्याचे व्यवस्थापक नीरज पांडे यांच्या कडे नातेवाईकांनी चौकशी केली असता त्यांनी तो त्याच दिवशी रात्री 8 वाजून 8 मिनिटांनी कार्ड पंचिंग करून कारखान्यांच्या बाहेर गेल्याचे सांगितले होते.
कारखानदारांन कडून लालसिंग बहुरा हा कामावरून घरी गेल्याचे सांगण्यात आल्याने 1 जानेवारी रोजी बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याची मिसिंग तक्रार नोंदवली होती. दरम्यान सोमवारी दुपारी कंपनीच्या छताला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत त्याचा सडत चाललेला मृतदेह आढळल्याने कामगारांमध्ये व परिसरातील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. याबाबत बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद घेऊन पुढील तपास बोईसर पोलिसांन कडून सुरू असल्याचे सांगितले जात असून मृत्यूचा उलघडा अद्यापही झालेला नाही. दरम्यान येथील ठेकेदार अचानक गावी गेल्याने आत्महत्या की वेगळे काही अशी उलटसुलट चर्चा बोईसर भागात सुरू आहे.