◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थ केअर कारखान्यातुन घातक रसायन सोडताना रंगेहाथ प्रदूषण नियंत्रण मंडळाने पकडले; कारवाई साठी मात्र प्रादेशिक कार्यालयातून विलंब
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सतत प्रदूषण करणाऱ्या एका उद्योजकांच्या आणखी एका कारखान्यांतील प्रदूषणाचा पर्दाफाश झाला आहे. कारखान्यातील घातक रसायन रात्रीच्या वेळी चोरट्या वाहिनीतून सोडत असताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व तारापूर एन्वारमेंट सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी पडले आहे. राष्ट्रीय हरित लवादाने कोट्यवधी रुपयांची दंड येथील कारखान्यांवर लावला असला तरी तारापूर मधील प्रदूषण दिवसेंदिवस सुरूच आहे. असे असले तरी या प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई साठी पाठवलेला प्रस्ताव महिना उलटत असला तरी ठाणे प्रादेशिक कार्यालयात धुळखात पडून आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थ केअर या अति प्रदुषणकारी कारखान्यांचे चार कारखाने या अगोदरच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केले आहेत. तरी देखील या उद्योजकांच्या प्लाँट नंबर एन- 178 या रासायनिक कारखान्यातुन छुप्या पध्दतीने घातक रसायन कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नसुन हे रसायन सांडपाणी वाहुन नेणाऱ्या वाहिनीत सोडले जात असल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याकडे सुरूवातीला दुर्लक्ष केले होते. दिवसेंदिवस वाढलेला प्रदूषणाचा स्थर व राष्ट्रीय हरित लवादाकडून कारवाईची असलेली टांगती तलवार यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र चालवणाऱ्या तारापूर एन्वारमेंट सोसायटीच्या अधिकाऱ्यांन सोबत सर्वेक्षण सुरू केले होते. याच सर्वेक्षणा दरम्यान बजाज हेल्थ केअर कारखान्यांचे छुपे प्रदूषणाचा पर्दाफाश झाला आहे.
औद्योगिक क्षेत्रातील सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया न करताच काही कारखानदार घातक रसायन रोजच सोडत असल्याने या कारखान्यांचा मागोवा घेणे सुरू आहे. 20 डिसेंबर 2020 रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व तारापूर एन्वारमेंट सोसायटीचे अधिकारी यांनी संयुक्त पणे रात्रीच्या वेळी कारखान्याच्या भागाची तपासणी सुरू केली होती. यावेळी बजाज हेल्थ केअर कारखान्यातुन मोठ्या प्रमाणात गडग हिरव्या रंगाचे घातक रसायन चोरट्या पध्दतीने सोडत असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी यांनी बजाज हेल्थ केअर कारखान्यावर कारवाई बाबत 21 डिसेंबर 2020 रोजी अहवाल पाठविण्यात आला होता. मात्र जवळपास कारवाईला महिना उलटत असताना देखील प्रादेशिक कार्यालय ठाणे यांच्या कडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे नेहमी प्रमाणे बजाज हेल्थ केअर कारखान्याला मोकळीक कोणत्या राजकीय दबावामुळे दिली जाते असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे.
◾ कारवाई करून देखील प्रदूषणाची सवय कायम
तारापूर मधील बजाज हेल्थ केअर कारखान्यातुन याअगोदर देखील घातक रसायनाची विल्हेवाट लावणे, सांडपाणी नाल्यात सोडणे, चोरट्या पध्दतीने घनकचरा वाहतूक करणे अशा अनेक गोष्टींन साठी या उद्योजकांचे चार कारखांने अनेकदा तक्रारी व वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बंद करण्यात आले आहेत. असे असले तरी या उद्योजकांच्या इतर कारखान्यातुन देखील प्रदूषण खुलेआम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी याठिकाणी झाली आहे.
◾ रात्रीच्या वेळी घातक रसायन सोडणाऱ्या बजाच हेल्थ केअर कारखान्यांवर कारवाई करावी यासाठी अहवाल प्रादेशिक अधिकारी ठाणे यांच्या कडे पाठविण्यात आला आहे. वरिष्ठ कार्यालयातुन कारवाई बाबत आदेश प्राप्त झालेले नाही.
— मनिष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तारापूर