◾ अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली असली तरी हजारो बांधकामावर कारवाई करण्याचे आवाहन; ग्रामपंचायत सदस्यांची अनधिकृत बांधकामात भर
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: पालघर तहसीलदारांनी बोईसर व सरावली भागातील अनधिकृत बांधकामावर अचानक केलेल्या कारवाई मुळे राजकीय भुमाफियांचे धाबे दणाणले होते. भूमाफियांना स्थानिक पातळीवर राजकीय पाठबळ व स्थानिक महसूल विभागाची असलेली साथ यामुळे अनधिकृत बांधकामे जोमाने उभी राहत असल्याचे खुद्द तहसीलदार यांनाच निदर्शनास आले. यामुळे कोणाच्याही दबावाखाली न येता पालघर तहसीलदार यांनी सरकारी जागेवर असलेल्या बांधकामावर बुलडोझर फिरवला आहे.
सरावली ग्रामपंचायत हद्दीत रोजच नवनवीन बांधकामे सरकारी जागेवर उभी राहत आहेत. एकट्या सरावली ग्रामपंचायत मध्ये सुमारे 5 हजार पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे सरकारी जागेवर बांधकाम करण्यात आली असून यासर्व बांधकामांना घरपट्टी देण्यात आली आहे. कर वसुलीच्या नावाखाली ग्रामपंचायत अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालते. त्यानंतर विद्युत जोडणीसाठी नाहरकत दाखला देखील दिला जातो. कालांतराने अशाच अनधिकृत चाळींना घर दुरूस्तीच्या नावाखाली इमारत बांधकाम करण्यासाठी परवानगी देत असल्याचे याअगोदर देखील उघड झाले होते. मात्र तरीही ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे. सरकारी जागेवर अनधिकृत बांधकाम होत असेल तर महसूल विभागाने कारवाई करावी असे सरावली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सांगत असल्याने ग्रामविकास अधिकारी यांची मतेदारी दिसून येत. यामुळे अशा अधिकाऱ्यांन वर भुमाफियांना पाठीशी घालत असल्याने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोरधरू लागली आहे.
सरकारी जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यासाठी भुमाफिया हे सुरूवातीला स्थानिक पातळीवर असलेल्या अधिकाऱ्यांना बांधकाम करत असल्याची समज देतात. अधिकाऱ्यांना हवी तेवढी आर्थिक इच्छा पुर्ण झाल्यावर भुमाफिया अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरू करतात. यातच अधिकाऱ्यांना न विचारता बांधकाम केल्यास दुसऱ्या दिवशी बांधकाम बंद किंवा तुटपुंजी कारवाई केली जाते. एखाद्याची तक्रार आल्यावर त्यांच्या वर कारवाई साठी अहवाल तहसीलदार पालघर यांच्या कडे सादर केला जातो. मात्र असे अहवाल पाठवून कारवाई बाबत आदेश कधीही येत नाही. अहवाल पाठविण्याचा दिखावा करून महिन्याभरातच अनधिकृत बांधकामा मध्ये परप्रांतीयांना भाड्याने किंवा विक्री केली जाते. त्यामुळे त्यानंतर लोकवस्ती आहे याचे कारण पुढे करत कोणत्याही प्रकारची कारवाई महसूल विभागाकडून करण्यात येत नाही. यातच ग्रामपंचायत सदस्यांची देखील याभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारली आहेत. अशा बांधकामांवर महसूल विभाग सोईस्कर पणे दुर्लक्ष करत असल्याचे आजवर दिसून आले आहे.
◾ तलाठी व कोतवालांचे भूमाफियांन सोबत लागेबांधे
पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांनी अचानक केलेल्या कारवाई मुळे तलाठी व कोतवालांची फसगत झाली. याअगोदरच केलेल्या तडजोडी मुळे इतर बांधकामावर कारवाई कशी करावी ही अडचण निर्माण झाली होती. मात्र पालघर तहसीलदार यांनी समोर दिसणारी बांधकामावर हातोडा मारला. याठिकाणी सुरू असलेली अनधिकृत बांधकामे ही सुरूवातीला सुरू असताना तलाठी व कोतवालांना देखील माहिती असल्याचे तहसीलदार यांच्या समोर उघड झाले. यामुळे आता स्वतः जातीने लक्ष देवून अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार असल्याचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी पालघर दर्पण सोबत बोलताना सांगितले.