◾ पत्रकारिता अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना पालघर जिल्हा पत्रकार परिषदेच्या वतीने मार्गदर्शन
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: जिल्ह्यात फक्त पत्रकार दिन साजरा करण्यासाठी धडपड न करता पत्रकार कसा घडावा त्यासाठी पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने पुढाकार घेतला आहे. नवनवीन तरूण पत्रकारांनी या क्षेत्रात यावे यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. असचा कार्यक्रम पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील गोदावरी परुळेकर महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या अभ्यासकेंद्रातर्फे पत्रकारितेचा पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी घेण्यात आला. यावेळी पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदे कडून पदविका व पदवी अभ्यासक्रमास प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तलासरी येथील गोदावरी परुळेकर महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठच्या अभ्यासकेंद्रातर्फे पत्रकारितेचा पदवी व पदविका अभ्यासक्रम रविवारी 10 जानेवारी पासून सुरू करण्यात आला. कोरोना काळात प्रत्यक्ष वर्ग सुरु करणे शक्य नसल्यानेे आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन गोदावरी परुळेकर महाविद्यालयात पत्रकारिता अभ्यासक्रमाचे संयुक्त सत्र आयोजित करण्यात आले होते. मराठीतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस वंदन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. पत्रकारिता अभ्यासक्रम सुरु करण्यामागील भूमिका स्पष्ट करतांना प्राचार्य डॉ. भगवान राजपूत यांनी पत्रकारितेची मुलतत्वे या विषयावर मार्गदर्शन केले.
जिल्ह्यातील पत्रकारांना नेहमीच आधारस्तंभ म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस व राजतंत्र दैनिकाचे संपादक संजीव जोशी यांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन केले. नवोदित पत्रकारांना दिशा व आव्हाने या बाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली असून त्यांची विशिष्ट बोलण्याच्या शैलीत त्यांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थांना प्रोत्साहन देणारे ठरले. याचवेळी दैनिक लोकसत्ताचे जिल्हा प्रतिनिधी नीरज राऊत यांनी स्वानुभवातून पत्रकारितेतील अडी, अडचणी व त्यावर अभ्यासपूर्ण लिखानाबाबत उपयुक्त माहिती देत मार्गदर्शन केले. तर पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष व झी मिडियाचे जिल्हा प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी इलेक्ट्रॉनिक मीडिया मधील पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन करत अँकर,कॅमेरामन, व फिल्ड वरील प्रत्यक्ष कामाच्या अनुभतील किस्से सांगत उपयुक्त माहिती दिली.
पत्रकारांनी आपल्या सेवे नुसार स्वतः च्या तब्येती कडे कसे लक्ष द्यावे याचे वेळोवेळी मार्गदर्शन करणारे बालरोग तज्ञ डॉ. हेमंत जोशी यांनी आरोग्य बाबत मार्गदर्शन केले. माजी सहा माहिती व जनसंपर्क अधिकारी निरंजन राऊत, पी.एम पाटील, यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मराठी पत्रकार परिषदेच्या संघाचे
उपाध्यक्ष हेमेंद्र पाटील, सरचिटणीस वैभव पालवे, नवीन पाटील, संदीप जाधव, नावेद शेख, विजय घरत आदी, शशी कासार, संजय लांडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन दत्तात्रेय शिंदे यांनी केले तर पोतनीस यांनी आभार व्यक्त केले.