◾तारापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरातील अनधिकृत बांधकामासंदर्भात तातडीने कारवाई करून अहवाल सादर करण्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे आदेश
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या परिसरात महसूल विभागाच्या पाठबळामुळे अनधिकृत बांधकामे जोमाने उभी राहिली आहे. मात्र आता विधानसभा अध्यक्ष यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत अणुऊर्जा प्रकल्पाच्या पाच किलोमीटरच्या अंतरावर कोणतेही निवासस्थानांचे नव्याने बांधकाम करण्यास परवानगी नसताना करण्यात आलेल्या बांधकामांवर कारवाई करण्यात यावी असे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या परिसरात अशा प्रकारे बांधकाम होणे गंभीर आणि धोकादायक असल्याने याबाबत तातडीने कारवाई करावी आणि एक महिन्याच्या आत कारवाई अहवाल सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिले.
तारापूर भागातील कांबोडा सोसायटीच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू करण्यात आली असून या सर्व बांधकामावर सुरूवाती पासुनच महसूल विभागाने दुर्लक्ष केले आहे. येथील 72 एकर नवीन शर्थीची सरकारी जमिनीचे बेकायदेशीररित्या केलेल्या हस्तांतरण आणि त्यावरील अनधिकृत बांधकामासंदर्भात बैठकीचे आयोजन विधानभवनात करण्यात आले होते. सरकारी जमिनिवर येथे अशाप्रकारे बांधकाम करणे कायदेशीर नाही असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगून अशामुळे संबंधित विकासकावर आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात यावी असे सूचित केले. यासंदर्भात अटी व शर्तीचा भंग झाल्याचे निदर्शनास येत असून याबाबत तातडीने कारवाई करून, कारवाईचा अहवाल एका महिन्यात सादर करावा असे निर्देश अध्यक्ष पटोले यांनी दिले आहेत. यातच अणुऊर्जा प्रकल्पाच्या अगदीच जवळ कुडण, पाचमार्ग भागात देखील मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे होत असताना देखील स्थानिक महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे सोईस्कर पणे दुर्लक्ष केलेले दिसून येते. यामुळे अनधिकृत बांधकामावर सुरूवाती पासुन दुर्लक्ष करणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांन वर देखील कारवाई करण्याची मागणी स्थानिकांंन कडून केली जात आहे.
◾ ताज गार्डन संकेतस्थळावरून अजूनही विक्री सुरूच!
कांबोडे सोसायटी च्या जागेत बंगले, फार्म हाऊस, प्लॉट, शेती तसेच औद्योगिक प्लॉट विक्री करण्यासाठी विशेष योजना कार्यरत असल्याची माहिती ताज गार्डेनच्या संकेतस्थळावर आज देखील झळकत आहे. या संपूर्ण परिसरात नऊशे चौरस फुटाचे तीन हजार बंगल्यात करिता प्लॉटची विक्रीचे संकेतस्थळ अजूनही माहिती प्रदर्शित होत असून या संकेतस्थळावर व स्पेशल ऑफर सुरु असल्याचा टॅग झळकत आहे.
◾अणुऊर्जा प्रकल्पापासून 1.6 ते पाच किलोमीटर परिसरात प्रकल्पाच्या उभारणी पूर्वीच्या घरांना संरक्षण देण्यात आले असून अशा घरांची दुरुस्ती तसेच नैसर्गिक वाढीला सशर्त परवानगी असते. त्याच पद्धतीने या परिसरातील शेती जमिनीवर शेतघर बांधण्यास परवानगी दिली जाऊ शकते. तारापूर गावातील सर्वे नंबर 128-अ मधील 48 व 25 एकर क्षेत्रफळाचे दोन तुकडे 1970 च्या सुमारास कांबोडा मच्छिमार सहकारी सामुदायिक शेती सोसायटी लिमिटेड या संस्थेला सामुदायिक शेतीसाठी देण्यात आले होते. ४८ एकरच्या क्षेत्रावर सोसायटीने भूविकास बँकेच्या कर्ज रक्कमेची परतफेड न केल्याने त्या जागेची नंतर लिलाव पद्धतीने विक्री झाली. या बाबत काही तांत्रिक मुद्द्यांवर हरकती घेण्यात आल्याने या बाबत पालघरच्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुनावणी अंतिम टप्प्यात आहे.
उर्वरित चोवीस एकर जागे पैकी 19.25 एकर जागेची सोसायटीने 2012 मध्ये साठे करार केला होता. या कराराच्या आधारावर सन २०१८ मध्ये एका व्यक्तीला रजिस्टर पावर मुखत्यारपत्र दिल्यानंतर या चोवीस एकर जागेमध्ये प्लॉटिंग करून एक ते तीन गुंठे क्षेत्राच्या तुकड्यांची विक्री सुरू आहे. या क्षेत्रफळाचे प्लॉटिंग करताना रस्त्यासाठी जागा सोडण्यात आली. त्याचबरोबर लगतच्या भागात असलेल्या सरकारी जागे वरील अतिक्रमणाचा भाग देखील प्लॉटिंगमध्ये समाविष्ट करण्यात येऊन या शासकीय जागेची देखील राजरोसपणे विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे ही जागा तारापूर अणुऊर्जा केंद्र पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असून त्या ठिकाणी यापूर्वी सहा ते सात बांधकाम पूर्ण झाली असून सद्य स्थितीत तितक्याच संख्येने बांधकाम सुरू असल्याचे दिसून येते.