◾घटनेच्या निषेधार्थ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मनोर ग्रामीण रुग्णालयाची बाह्यरुग्ण सेवा बंद; बहाडोली गावच्या पोलिस पाटलासह चौघांवर गुन्हा दाखल
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: सर्पदंशाचा उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात आलेल्या रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांनी रविवारी रात्री वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत दमदाटी आणि शिवीगाळ करीत गैरवर्तन केले होते. याबाबत मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
रविवारी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास बहाडोली गावातील सुहास किणी यांना सर्पदंश झाल्याने उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ड्युटीवरील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णावर उपचार सुरू केले होते. परंतु रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना सुरू असलेले उपचार मान्य नसल्याने रुग्णाने त्याच्या हाताला लावलेले सलाईन काढून फेकून दिले. त्यानंतर हाताला लावलेले ऑक्सिमिटर फेकून देण्याचा दम देत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला आणि दमदाटी केली होती. या घटनेनंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हल्ल्यानंतर सोमवारी मनोर पोलीस ठाण्यात चौघां आरोपींविरोधात विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तीन आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींमध्ये बहाडोली गावच्या पोलीस पाटलाचाही समावेश आहे. या घटनेच्या निषेधार्थ ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सोमवारी दिवसभर बाह्यरुग्ण सेवा बंद ठेवली होती.
सोमवारी सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल थोरात यांनी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात भेट देत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. तसेच कारवाई बाबत ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले होते. सोमवारी सकाळपर्यंत मनोर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. परंतु दुपार नंतर वरिष्ठांकडून आदेश मिळाल्यानंतर मनोर पोलिसांना जाग आली. त्यानंतर याप्रकरणी चार आरोपींविरोधात शासकीय कामात अडथळा,कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.सायंकाळ पर्यंत मनोर पोलिसांकडून सुहास किणी,गजानन किणी आणि बहाडोली गावचे पोलीस पाटील कल्पेश कुडू या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
◾मनोर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दमदाटी आणि शिवीगाळ करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रतिबंध घालण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
— डॉ दिनकर गावित
वैद्यकीय अधीक्षक, मनोर ग्रामीण रुग्णालय.