◾हेमेंद्र पाटील
राष्ट्रीय हरित लवादाने कोट्यावधी रूपयाचा दंड ठोठावला असला तरी तारापूर मधील प्रदूषणकारी कारखाने सुधारणा करण्याच्या मनस्थितीत नाही. कारखान्यांचे प्रदूषण सुरू असले तरी मुंबईत बसलेले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी आपल्या सोईनुसार कारखान्यांवर तुटपुंजी कारवाई करताना दिसतात. याच सत्ताधारी पक्षांच्या पर्यावरण मंत्र्यांना अद्यापही तारापूर च्या काळवंडलेल्या प्रदूषणकाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. येथील याच पक्षांच्या नेत्यांची तारापूर मधील विविध कारखान्यात असलेली कामे यामुळे पर्यावरण मंत्र्यांच्या कानापर्यंत येथील परिस्थिती देखील जात नाही.
तारापूर परिसरातील गावातील कुपनलिका व नैसर्गिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत पुर्णपणे प्रदूषित झाल्याचे खुद्द जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. येथील अनेक गावात कुपनलिकेला येणारे पाणी पिण्यासाठी व कोणत्याही वापरासाठी बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील अशा प्रदूषणकारी कारखान्यावर मेहरबान असलेली यंत्रणा व त्याला पाठिशी घालणारे पुढारी यामुळे तारापूर दिवसेंदिवस धोकादायक होऊ लागले आहे. याभागात हवा, जमीन, नैसर्गिक नाले व आता भूगर्भातील पाण्याचा साठा देखील प्रदूषित झाला असला तरी राज्य सरकार अद्यापही प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई करण्याच्या मनस्थितीत नाही. स्थानिक पातळीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी एखाद्या कारखान्यांवर कारवाई बाबत तडजोड झाली नाही तर पाठवलेला अहवाल यावर प्रादेशिक अधिकारी यांच्या कडून कारवाई बाबत आदेश येण्यासाठी दिरंगाई होते. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता मुंबई कार्यालयात अहवाल सादर केला आहे, त्यांनी परवानगी दिल्यानंतर कारखान्यांवर कारवाई करू असे ठरलेले उत्तर दिले जाते.
मुळात येथील लोकांना देखील प्रदूषणाची सवय झाली आहे असे म्हटले तर हे वादग्रस्त वाक्य ठरू शकते. परंतु प्रदूषणाबाबत ओरडून ओरडून नागरिक देखील हतबल झाले तरी देखील शासकीय यंत्रणा व राज्यकर्ते यांना त्याचे कोणतेही देणेघेणे नाही. याचे कारण तारापूर देशात सर्वात प्रदूषणकारी ठरले असताना देखील पर्यावरण विभागाने तारापूर मध्ये डोक्यावर करून देखील पाहिले नाही. एखाद्या प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई झाल्यानंतर येथील दलाल अशा कारखान्यांना सुरू करण्यासाठी आर्थिक वजन टाकून कायद्यातील पळवाटा शोधून कारखाने सुरू करतात. नरहरी, चौधरी व पटेल या काल्पनिक नावाचे दलाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना तारापुरच्या प्रदूषणातील सोनेरी मलई पोचवितात त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी सद्यातरी जोमाने कामकाज राबविण्यात व्यक्त असल्याचे दिसून येते.
तारापूर मधील सर्वात जास्त प्रदूषणकारी कारखाना असलेल्या आरती ड्रग्ज उद्योजक समुहाला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नेहमीच पाठीशी घालत आले आहे. कारखान्यातुन निघणारे घातक रसायन प्रक्रिया करण्याच्या नावाखाली इतर कारखान्यात पाठवुन तेथून नैसर्गिक नाल्यात सोडून दिले जात असल्याचे याअगोदर देखील उघड झाले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरती ड्रग्ज उद्योजकांचा एक कारखाना बंद केला असला तरी इतर कारखान्यांवर कारवाई बाबत अहवाल अद्यापही वरिष्ठ कार्यालयात धुळखात पडून आहेत. किंबहुना त्यावर काही तरी वजन कारखानदारांने टाकले असलेल्याची शक्यता नाकारता येत नाही. यातच डिसेंबर महिन्यात बजाज हेल्थ केअर कारखान्याकडून बेकायदेशीर पणे घातक रसायन हे रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिनीत सोडताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व तारापूर एन्वाँमेंट सोसायटीच्या अधिकाऱ्यांनी पकडले त्याबाबत स्थानिक अधिकारी यांनी अहवाल दुसऱ्या दिवशी पटकन प्रादेशिक कार्यालयात सादर केला परंतु महिना उलटून देखील कारवाई बाबत कोणतेही आदेश आले नाही. ही फक्त दोनच नाही येथील शेकडो कारखान्यांची स्थिती अशीच असून शासकीय यंत्रणा तारापुरच्या प्रदूषणात पुर्णपणे माखली असल्याचे बोलले तर काही वावगे ठरणार नाही.