◾पोफरण रस्त्यावर मध्यभागी डांबर टाकून पाच लाखाला लावला चुना; डांबरीकरण करताना गैरहजर असलेल्या शाखा अभियंत्याने कामकाज सोपवले ठेकेदारावर
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: पालघर तालुक्यातील पुनवर्सन झालेल्या पोफरण गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असताना देखील त्याकडे दुर्लक्ष करत मुख्य रस्त्यावर थोडा डांबर टाकून पाच लाखाच्या निधीचा दर्जाहीन काम करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या फंडातून येथील खराब झालेल्या रस्त्यासाठी निधी मंजूर होता. मात्र कोविड मुळे काम करता आले नाही असे कारण देत पंचायत समिती बांधकाम विभागाने निधी संपावा यासाठी चक्क मुख्य रस्त्यावर एका भागात डांबर टाकून पाच लाख रूपयाच्या निधीला चुना लावला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोफरण गावातून अक्करपट्टी गावात जाण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असुन हा रस्ता बनवावा यासाठी नागरिकांनी अनेकदा मागणी केली आहे. मात्र निधी उपलब्ध नाही असे कारण पुढे करत आजवर या रस्त्यांची डागडुजी देखील करण्यात आली नाही. परंतु जिल्हा परिषद सदस्यांचा मागच्या वर्षीचा रस्त्यासाठी मंजूर असलेला निधी संपविण्यासाठी पंचायत समितीच्या अभियंत्यांने पोफरण गावाच्या मुख्य रस्त्यावर मध्यभागी डांबर टाकून एक कप्पा मारला आहे. कोविड मुळे शासनाने अत्यावश्यक असलेल्या ठिकाणी रस्त्यांची कामे करावी असे निर्देश असताना देखील ठेकेदारा मंजूर असलेले काम व्हावे यासाठी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने रस्त्यावर डांबराचा थर पसरवुन पाच लाख रूपयाच्या निधीचा अपव्यय केला आहे. याअगोदरच पुनवर्सन असलेल्या गावात विकास कामे करण्यासाठी निधीची कमतरता असल्याने निधीचा दुरपयोग करणाऱ्या अधिकाऱ्यांनवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.
पोफरण गावाला जोडणारा मुख्य रस्ता मागील अंदाजे पाच वर्षापूर्वी बनविण्यात आला होता. मात्र दर्जाहीन झालेल्या कामामुळे हा रस्त्यावरील डांबर दोन वर्षातच निघून गेला होता. यामुळे अंदाजे दिड किलोमीटरचा रस्ता संपूर्ण खराब झाला आहे. यामुळे रस्त्यांचे काम सुरू झाल्याने नागरिकांना आनंद झाला होता. परंतु हा रस्ता दुसऱ्या दिवशी थांबल्याने रस्ता पुर्ण का होत नाही. याबाबत विचारणा केली असता रस्ता फक्त 160 मिटर होईल एवढाच निधी उपलब्ध असल्याचे पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बी. डी. जाधव यांनी पालघर दर्पण सोबत बोलताना सांगितले. रस्त्यांचे काम सुरू असताना शाखा अभियंता त्याठिकाणी उपस्थित नसल्याने ठेकेदाराने आपल्या मर्जीने अंदाजपत्रकातील बाबींन कडे दुर्लक्ष करून काम केल्याचे रस्त्यांचे काम पाहिल्यावर दिसून आले आहे. यातच रस्त्यावर टाकलेल्या डांबरातील खड्डी निघून गेली होती. डांबर टाकताना योग्य तापमान आहे की नाही याबाबत देखील पाहणी बांधकाम विभागा कडून करण्यात आली नाही. यामुळे या संपूर्ण कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असून कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.
◾ निकृष्ठ झालेल्या कामाबाबत पंचायत समिती बांधकाम विभागाचे उप अभियंता हेमंत भोईर यांना याबाबत विचारणा केली असता शाखा अभियंता यांना विचारून माहिती घेतो असे सांगण्यात आले. परंतु 10 जानेवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी या डांबरावर वरचा थर टाकून काम पुर्ण करून निकृष्ठ काम लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
◾पंचायत समिती बांधकाम विभागाचे उप अभियंता हेमंत भोईर यांना निकृष्ठ दर्जाचे काम व निधी खर्च व्हावा याठिकाणी केलेले काम याबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपूर्ण साधला असता त्यांनी याबाबत माहिती घेतो असेच उत्तर दोन दिवस उलटून गेल्यावर देखील दिले असून अधिक बोलण्यास नकार दर्शवला.
◾ कागदोपत्री तपासणी अहवाल
ठेकेदार करत असलेल्या दर्जाहीन कामामुळे तालुक्यातील अनेक रस्ते वर्षभरात खड्डेमय होतात. मात्र रस्त्यांचे काम करताना वापरले जाणारी खड्डी, डांबर यांची तपासणी करण्यासाठी बंधनकारक असते. परंतु अशा कोणत्याही प्रकारची तपासणी न करताच ठेकेदार तपासणी अहवाल सादर करत असल्याचे याअगोदर उघड झाले होते. यामुळे रस्त्याच्या कामासाठी वापरले जाणारे साहित्य चांगल्या दर्जाचे आहे. असा तपासणी अहवाल सादर करून अभियंता व ठेकेदारा आपले पितळ पांढरे करून घेत असल्याचा आरोप जाणकारांन कडून केला जात आहे.
◾मागील वर्षाचा निधी मंजूर होता परंतु कोविड मुळे काम करता आले नाही. यामुळे मुख्य रस्त्यावर डांबरी करत थोड्या भागात करण्यात आले. डांबरीकरण करताना अचानक पंचायत समिती वरिष्ठ अधिकारी यांनी मिटींग साठी बोलवून घेतल्याने त्याठिकाणी उपस्थित राहु शकलो नाही.
— बी. डी. जाधव, शाखा अभियंता पंचायत समिती बांधकाम विभाग पालघर