◾सरकारी जागेवर उभारलेल्या अनधिकृत बांधकामांना ग्रामपंचायती कडून सुविधा; भुमाफियांना सोईसुविधा साठी ग्रामपंचायतीचा लाखोंचा निधी खर्च
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायत हद्दीत सरकारी जागेवर हजारो बांधकामे उभी राहिली असून अशा अनधिकृत बांधकामांना सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायत करत आहे. एकीकडे महसूल विभाग सरकारी जागेवर असलेल्या बांधकामावर कारवाई सुरू करत असली तरी दुसरी कडे सरावली ग्रामपंचायतीने लाखो रूपये खर्च करून गटाराचे बांधकाम सुरू केले आहे. यातच महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी असलेली अनधिकृत बांधकामे उभारून त्याला सुविधेसाठी ग्रामपंचायतीचा निधी वापरला जात असल्याने अनधिकृत बांधकामांना एकप्रकारे मोकळीक मिळत आहे.
सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगर, आनंदी नगर, भैय्या पाडा अशा अनेक भागात मोठ्या प्रमाणात सरकारी जागेवर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अशा बांधकामावर महसूल विभागाचे स्थानिक अधिकारी आर्थिक दबावाखाली येवून दुर्लक्ष करतात. त्यानंतर ग्रामपंचायत अशा अनधिकृत बांधकामांना घरपट्टी व विद्युत पुरवठा साठी नाहरकत दाखला देते. त्यानंतर संपूर्ण इमारतीत लोकवस्ती झाल्यानंतर त्याठिकाणी पाणीपुरवठा नळ योजना, गटारे व रस्ते यासाठी पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या फंडाचा वापर केला जातो. याभागातील ग्रामपंचायत सदस्य यांची स्वतः ची अनधिकृत बांधकामे असल्याने इतर याभागात सुविधा पुरविण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो. एकदा याभागात अनधिकृत उभारलेल्या इमारती मध्ये लोकवस्ती झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही असा समज भुमाफियांचा असल्याने पहिला मजला झाल्या नंतर पटकन खालच्या ठिकाणी भाड्याने किंवा विकत रूम दिली जाते. आणि अशा अनधिकृत घरांना घरपट्टी फेरफार देखील त्वरित केला जातो. मात्र त्यासाठी आर्थिक प्रक्रिया केली जात असल्याची माहिती समोर येत आहे.
सरकारी जागेवर उभ्या राहिलेल्या अवधनगर भंगार गल्ली भागात अलसिफा मेडीकल याठिकाणी मधल्या रस्त्यावर गटाराचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. हा संपूर्ण भाग भंगार गोडाऊन व अनधिकृत वस्त्यांनी व्यापला असून नवनवीन बांधकामे याच ठिकाणी सुरू आहेत. मात्र सोईसुविधा पुरविण्याच्या नावाखाली याठिकाणी गटाराच्या बांधकामासाठी ग्रामनिधी तुन सुमारे 18 लाखाचा निधी खर्च केला जात आहे. याभागातील सुरू असलेल्या अनधिकृत इमारती मधील सांडपाणी हे येट नाल्यात जावे यासाठी हा खटाटोप केला जात आहे. भुमाफियांनी सुरू केलेल्या बांधकामामुळे याठिकाणी अनधिकृत वस्ती झपाट्याने वाढली असून अशा बांधकामावर कारवाई करायचे सोडून मोठ्या प्रमाणात सुविधांची खैरात केली जात आहे. यामुळे अनधिकृत इमारतींना पाठबळ मिळत असल्याने भुमाफियांना सोईसुविधा पुरविणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून केली जात आहे.
◾ मतदारसंघ अबाधित राहण्यासाठी प्रयत्न
सरावली ग्रामपंचायतीचे उत्पन्न कोट्यवधी रुपयांचे असल्याने याठिकाणी ग्रामपंचायत सदस्य निवडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करतो. यातच आपले मतदारसंघ अबाधित राहण्यासाठी येथील अनधिकृत बांधकामांना स्थानिक सदस्य पाठबळ देतो. त्यानंतर अशा वस्त्यांना सोईसुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात. परप्रांतीय मतदारांना आपल्या कडे वळविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य यांनी आजवर अनधिकृत बांधकामांना पाठीशी घातले आहे.
◾ सरावली ग्रामपंचायतीच्या निम्म्या पेक्षा जास्त सदस्यांचे सरकारी जागेवर अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. यामध्ये आताचे उपसरपंच अशोक शाळूंके यांचे सर्वाधिक बांधकाम याभागात असून ग्रामपंचायत अधिनियमानुसार अशा सदस्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. मागील वर्षी एका तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांची यादी पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडे देण्यात आली होती. मात्र आजवर त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
◾ज्याठिकाणी वस्ती आहे त्याठिकाणी सुविधा पुरवणे ग्रामपंचायतीचे काम आहे. अवधनगर येथील भंगार गल्लीत ग्रामनिधी मधून गटाराचे काम हाती घेतले आहे. सरकारी जागेवर सुरू असलेल्या बांधकामावर कारवाई करण्याचा अधिकार महसूल विभागाचा आहे.
— सुभाष किणी, ग्रामविकास अधिकारी सरावली