◾तारापूर औद्योगिक क्षेत्रातील इम्पल फार्म कारखान्याला उत्खनन केल्या प्रकरणी 59 लाख 88 हजार 411 रूपयाच्या दंडाची नोटीस
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका औषध कारखान्याला बेकायदेशीर माती उत्खनन केल्या प्रकरणी लाखोचा दंड ठोठावण्यात आला आहे. उत्खनाची रितसर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेताच कारखान्यांच्या बांधकामासाठी मातीचे बेकायदेशीर उत्खनन केल्यामुळे दंडाची नोटीस पालघर तहसीलदार यांनी बजावली आहे.
सरावली महसूल क्षेत्रात येणाऱ्या तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक जे-202,208 इम्पल फार्म प्रा.लि. या कंपनीला महसूल विभागाने बेकायदा गौणखनिज उत्खनन तसेच भराव/साठा केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. या कारखान्याच्या उद्योजकाला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48(7) नुसार गौणखनिज प्रति ब्रास रकमेच्या पाचपट असा 59 लाख 88 हजार 411 रूपयाच्या दंडाची नोटीसबजावली आहे. या कारखानदारांने बांधकाम करण्यासाठी 10 हजार 99 ब्रास एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले आहे. सरावली तलाठी हितेश राऊत यांनी याबाबत तपासणी करून अहवाल तहसीलदार यांच्या कडे सादर केला होता. तहसीलदार सुनिल शिंदे यांनी बजावलेल्या दंडात्मक नोटीसी मुळे कारखानदाराला माती उत्खनन अंगलट आले आहे.