◾बोईसर तारापूर रस्त्याच्या रुंदीकरणात साईटपट्टीसाठी मुरूमा ऐवजी रस्त्यातील खोदलेली मातीचा केला भराव; मुरूमाचे पैसे वाचवण्यासाठी ठेकेदाराची शक्कल
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: राष्ट्रीय रस्ते विकास प्रकल्पा अंतर्गत सुरू असलेल्या बोईसर तारापूर रस्त्याच्या साईडपट्टी च्या कामासाठी नमूद केलेल्या मुरूम ऐवजी इतरत्र खणलेल्या मातीचा वापर केल्याने महत्त्वपूर्ण रस्त्याचा दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदाराच्या मर्जीनुसार सुरू असलेल्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखील दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. याबाबत संबंधित शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष होत असल्याने देशाच्या विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या कामाकडे लक्ष देण्यासाठी कोणी वाली आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
टाळेबंदीत दोन वर्षापासून रखडलेल्या बोईसर तारापूर रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले होते. काम सुरू करताना पहिल्या टप्प्यात करण्यात आलेल्या बोईसर ते भिमनगर पर्यंत रस्त्यावर पडलेल्या भेगा यामुळे दर्जाहीन कामावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. मात्र हे काम 10 वर्षे देखभाल दुरूस्ती ठेकेदार करणार असल्याचे कारण देत सार्वजनिक बांधकाम विभागाने दर्जाहीन कामाकडे दुर्लक्ष केले. असो परंतु आता ठेकेदाराने खोदकाम केलेल्या रस्त्याच्या मातीचा भराव साईटपट्टीसाठी वापर करण्याची शक्कल लढवली आहे. सद्यस्थितीत चित्रालय भागात सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकाम करतेवेळी खोदकाम केलेली माती ही सिडको रूपरजत भागात बनविण्यात आलेल्या रस्त्यांच्या दुतर्फा साईटपट्टीसाठी माती भराव केला जात आहे. मात्र ठेकेदाराने मनमर्जी प्रमाणे सुरू केलेल्या दर्जाहीन कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष का करते असा सवाल नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी देखील महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.
रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रीटीकरण केल्यानंतर त्यांच्या बाजूला रस्ता खराब होऊ नये व पावसाळ्यात पाणी साचून चिखल होऊनये यासाठी खडतर मुरूम मातीचा भराव केला जातो. साईटपट्टीसाठी साधारण एक मिटर रुंदी पर्यंत वापरलेल्या मुरूमा मुळे रस्ता देखील मजबूत राहण्यासाठी मदत होते. यातच मुरूमा मध्ये पाणी साचून राहत नसल्याने रस्त्याच्या बाजूला चिखल देखील होत नाही. मातीच्या दरापेक्षा मुरूमाचे दर जास्त असल्याने ठेकेदाराने खोदकाम करताना निघालेल्या मातीचा मुलामा साईटपट्टीसाठी चढवून लाखो रूपयाचे साईटपट्टीचे देय काढण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे मातीचा मुलामा चढवून मुरूमाचे पैसे लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदारावर वेळीच लगाम लावण्याची मागणी नागरिकांन कडून केली जात असून सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकी काय कारवाई करते की, मागच्या वेळी सारखे ठरलेले उत्तर देते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
◾ *माती गेली चोरीला*
बोईसर तारापूर रस्त्यांचे काम टाळेबंदीत सुरू करताना बोईसर बस स्थानक ते भिमनगर भागातील काम हाती घेतले होते. यावेळी खोदकाम करताना निघालेली लाखो ब्रास माती गायब झाली आहे. ठेकेदाराने या मातीची विल्हेवाट कुठे लावली याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नसुन ही निघालेली लाखो रूपयाची माती बोईसर भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर इमारतीच्या कामासाठी भराव करण्यासाठी भूमाफियांना ठेकेदाराने विकली असल्याची माहिती खात्रीशीर सुत्रांकडून समोर येत आहे. यामुळे चोरीला गेलेली माती आता शोधून काढणे प्रशासनासमोर आवाहन आहे.
◾ *साईड पट्टी का*
नव्याने उभारलेल्या रस्त्या ला आधार देण्यासाठी तसेच रस्त्यावरील पाणी खाली उतरण्यासाठी व नागरिकांना जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी साईडपट्टी चा वापर होतो. योग्य प्रकारे साईडपट्टी तयार न केल्यास मूळ रस्त्यात व लगतच्या भागात त्रासदायक स्थिती निर्माण होते.
◾ रस्त्यावर दुतर्फा साईटपट्टीसाठी मुरूम ऐवजी टाकलेला मातीचा व खोदकाम करून चोरीला गेलेली माती याबाबत पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बडे यांना संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करतो व त्यानंतर बोलतो असे उत्तर दिले आहे.