◾ तारापूर मधील प्रदूषणकारी बजाज हेल्थ केअर कारखान्यावर कारवाई व्हावी यासाठी पालघर दर्पणने केला होता पाठपुरावा
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: गेल्या अनेक महिन्यांपासून प्रदूषण करण्याच्या कारणावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बजाज हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अखेर उत्पादन बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. या कारखानदारा कडून वारंवार प्रदूषणाचा प्रकार घडत असल्याने यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एन 178 मध्ये असलेल्या या औषध निर्मिती कारखान्यातून अनेकदा रासायनिक पदार्थ कोणतीही प्रक्रिया न करता एमआयडीसीच्या जलवाहिनी व गटारात टाकत असल्याचे निदर्शनास आले होते. यासंदर्भात पालघर दर्पणने अनेकदा वृत्त प्रसिद्ध करून त्याचा पाठपुरावा केला होता. 20 डिसेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी यांनी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात ओवरफ्लो होत. असल्याच्या कारणाने कारखान्यांची पाहणी केली असता या कारखान्यातुन दाट हिरव्या रंगाच्या रासायनिक सांडपाणी चे बायपास वाहिनी मधून एमआयडीसीच्या सांडपाणी जलवाहिनी विनाप्रक्रिया रसायन सोडले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्याचबरोबरीने या औषध निर्मिती उद्योगात केमिकल ऑक्सिजन डिमांड सी ओ डी ची अधिक मात्रा असणारे रासायनिक सांडपाणी स्वतंत्रपणे साठवण्याची व्यवस्था करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. तसेच सीओडी चे अधिक प्रमाण असलेले सांडपाणी एमआयडीसी जलवाहिनी सोडण्यात येत असल्याचे तपासणी दरम्यान दिसून आले होते.
बजाज हेल्थ केअर उद्योगांनी एप्रिल ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत कारखान्यात निर्माण झालेला घातक घनकचरा प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन कंपनीकडे पाठविण्यात आला नसल्याचे तसेच प्रदूषण नियंत्रण व्यवस्थेसाठी स्वतंत्र वीज जोडणी घेतली नसल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. या आधारावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी 14 जानेवारी रोजी कंपनीने उत्पादन बंद करण्याचे आदेश दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांनी अहवाल पाठवुन देखील कारवाई कडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले होते. याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून त्याचा पाठपुरावा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.