पालघर दर्पण: वार्ताहर
पालघर: वाडा ग्रामीण रुग्णालयामध्ये
रुग्णसंख्या वाढली मात्र ३० खाटाच उपलब्ध वाडा- वाडा येथील ग्रामीण रुग्णालय ३० खाटांचे असून वाढत्या लोकसंख्येमुळे ग्रामीण रुग्णालय रुणांना अनेक सोयीसुविधा देण्यात असमर्थ ठरत आहे. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. म्हणून या रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयचा दर्जा देउन इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार कपिल पाटील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्राद्वारे केली आहे.
वाडा ग्रामीण लोकसंख्या १ लाख ६९ हजार ७७२ ही कागदपत्रे असली तरी यापेक्षा अधिक नागरिक या परिसरात राहतात. तसेच या रुग्णालयात शहापूर, विक्रमगड, मोखाडा आणि भिवंडी तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. या रुग्णालयात पुरुष आणि स्त्रियांसाठी एक कक्ष आहे. येथे ३५० ते ४०० च्या आसपास बाह्यरुग्ण तर ५० ते ६० अंतरुग्ण तपासणीसाठी येत आहेत. महिन्यासाठी ९० ते १०० प्रसूती होतात. गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी गर्भवतीना ठाणे व मुंबई येथील सरकारी रुग्णालयात पाठवले जाते. त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. शिवाय सपंदश, विचूदंश, गॅस्ट्रो व इतर आजारांच्या रुग्णांचीही संख्या मोठी आहे. तसेच महामार्गवर नेहमी अपघात होत असल्याने अपघातग्रस्तांनाही उपचारासाठी याच रुग्णालयात आणले जाते. या रुग्णालयात ३० खाटा असल्यामुळे रुग्णांना जमिनीवरच उपचार ध्यावे लागत आहेत.