■ शेतकरी कंटाळून निघून जावे म्हणून गोष्टी ताणल्या जात आहेत; शेतकऱ्यांचा आरोप
पालघर दर्पण : प्रतिनिधी
कृषी कायदे रद्द व्हावे यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. या आंदोलनाला २ महिन्यांपेक्षाही जास्त दिवस झाले असून देखीलही अद्याप तोडगा निघाला नाही. शेतकरी संघटना मात्र आपल्या निर्णयावर ठाम असून मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असे शेतकरी संघटनांच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ४ सदस्यीय समितीची देखील नेमणूक केली आहे. मात्र या समितीसमोर जाण्यास आंदोलक शेतकरी तयार नाहीत. केंद्र सरकार व शेतकरी संघटनांची ९ वेळा चर्चेसाठी बैठक घेण्यात आली मात्र या ९ बैठकी होऊन देखील तोडगा निघू शकला नाही त्यामुळे कृषी कायदे समितीवर नवीन सदस्य नेमण्याची मागणी शेतकरी संघटना करीत आहे.
अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मोल्ला यांनी सरकारवर आरोप केला आहे. जवळपास दोन महिने झाले असून आम्ही थंडीच्या वातावरणाने त्रस्त आहोत व मरत आहोत. आम्ही कंटाळून इथून निघून जावं म्हणून सरकार केवळ तारखेवर तारीख देत आहे. व गोष्टी ताणत आहे असं हन्नान मोल्ला यांनी म्हटलं आहे.