◾ अवधनगर येथील तोडण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होऊ नये यासाठी आमदारांच्या नावाचा वापर; डहाणूचे माकप आमदार विनोद निकोले यांचा पीए असल्याची बतावणी करून तहसीलदारांवर आणला होता दबाव
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: सरावलीच्या भूमाफियांना वाचवण्यासाठी व त्याच्यावर कारवाई होऊ नये यासाठी सर्वच पक्षांचे नेते प्रयत्न करत असल्याचे आजवर दिसून आले आहे. मात्र आता डहाणू विधानसभा मतदार संघाच्या आमदारांचा पीए बोलतोय अशी बतावणी करत आपल्या कार्यकर्तांच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नका असा दबाव तहसीलदार यांच्यावर टाकण्यात आला होता. मात्र पालघर तहसीलदार यांनी दबावाखाली न येता भूमाफियांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा मारला आहे.
अवधनगर भंगार गल्ली भागात सहा गाळे असलेली इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. खालच्या मजल्यावर असलेल्या सहा गाळ्यांची भिंत महसूल विभागाने काही दिवसांपूर्वी तोडली होती. मात्र पुन्हा याठिकाणी बांधकाम करण्यात आल्याने 15 जानेवारी रोजी बांधकाम तोडण्याची सुरूवात पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांनी केली होती. यावेळी माकपचे डॉ. आदित्य अहिरे यांनी मी आमदार विनोद निकोले यांचा पीए बोलतोय हर्षल लोखंडे यांच्या बांधकामावर पण कारवाई करायला जाणार आहेत का तिथे जाऊ नका आपला कार्यकर्ता आहे असे सांगण्यात आले होते. यामुळे हे बांधकाम माकपच्या कार्यकर्तांचे आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. मात्र त्याठिकाणी बांधकाम तोडण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी गेले असताना डॉ. आदित्य अहिरे यांनी उल्लेख केलेला हर्षल लोखंडे नामक इसमाने काही अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांना सोबत घेऊन प्रशासना विरोध जोरदार घोषणाबाजी सुरू केली होती.
अनधिकृत बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीवर माकप पक्षांचेझेंडे देखील लावण्यात आले होते. माकप आमदारांचा पीए बोलतो असे सांगुन भुमाफियांन साठी शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असल्याने भुमाफियांना वाचवण्यासाठी अशा प्रकारे संघटना आपल्या ताकदीचा वापर करतात हे लक्षात येते. मुळात पीए बोलतो अशी बतावणी करणारे डॉ. आदित्य अहिरे हे नेमके पीए आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे.
◾ पालघर तहसीलदार यांना कोणत्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क साधला होता. पीए बोलतो असे सांगुन तहसीलदार यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणला नाही.
— डॉ. आदित्य अहिरे, माकप डहाणू