◾पालकमंत्र्यांच्या थाटात आमदारांचा वावर; आदिवासी भाग असलेल्या मतदारसंघात आमदाराला नेमकी कसली भिती
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: एकीकडे राज्य सरकारने भाजपच्या नेत्या सह अनेक व्हीआयपी नेतेमंडळींच्या सुरक्षितते मध्ये कपात केली असली तरी आमदार सुनील भुसारा यांना विशेष सुरक्षा दिल्याचे दिसून येते. दोन स्टेन गन धारी पोलीस रक्षकांसह, पोलिसांचा ताफा व अतिरिक्त पायलट कार ची सुविधा शासनाकडून बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे विक्रमगड चे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याच्या थाटात सर्वत्र वापर करत असताना त्यांना नेमका धोका कोणापासून आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा सह विविध पक्षांतील नेत्यांचे संरक्षण कवच कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद चंद्रजी पवार यांनी आपल्या पुरवण्यात आलेल्या संरक्षणात कपात करण्याचे राज्य सरकारला सुचवले असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विक्रमगड चे आमदार सुनील भुसारा यांना मात्र द्विस्तरीय संरक्षण कवच पुरवण्यात आले आहे. आमदार महोदयांना एका खाजगी वाहना च्या आधारे पोलीस एस्कॉर्ट पुरवण्यात आला असून या वाहनाला सायरन भोंगा देखील आहेत. त्यामुळे एखादे मंत्री किंवा पालक मंत्री यांच्या प्रमाणे विक्रमगडचे आमदार सर्वत्र फिरत असल्याने त्यांची एक स्वतंत्र छबी निर्माण झाली आहे.
आमदार भुसारा यांनी काही दिवसांपासून झंझावती दौऱ्यांचा कार्यक्रम नियोजित करून यात संपूर्ण सहकाऱ्यांन सह ते फिरत असल्याचे दिसून आले. यामुळे विक्रमगड भागात फिरताना स्थानिक पोलिसांची गाडी व काही पोलीस देखील त्यांच्या सोबत असताना दिसून येतात. त्यांच्या मतदारसंघात सर्वत्र शांतता व गुण्या-गोविंदाने नांदणारे इतर राजकीय पक्षांचे नेते असताना त्यांना नेमका कोणापासून धोका आहे हा प्रश्न त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना भेडसावत आहे.
आदिवासी बहुल असलेल्या विक्रमगड मतदारसंघात गोरगरीब नागरीकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अतिरिक्त पोलीस सोबत घेऊन फिरण्याचा आनंद आमदार घेत आहे की काय असा प्रश्न समोर येत आहे. अडीअडचणीच्या काळात कामाला येणारा आपला माणूस स्वतंत्र छबी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांच्या संरक्षणामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये वेगळी छबी निर्माण करण्या ऐवजी सर्वसामान्य नागरिकांची दरी निर्माण होत असल्याचे दिसून आले. खूषमसक्यानी घेरलेल्या आमदारांना नागरिकांचे मनातले सांगणार कोण हा प्रश्न निर्माण झालाय.
◾ खाजगी वाहनाला पोलीस एस्कॉर्ट चा दर्जा
आमदार सुनिल भुसारा यांच्या ताब्यात असणाऱ्या एका खाजगी वाहनाला पोलीस असे कागदाचे चित्र लावण्यात आले असून त्या वाहनाला पोलीस एस्कॉर्ट चा दर्जा देण्यात आला आहे. पोलिसांकडून तसेच परिवहन मंडळाकडून वेगवेगळ्या प्रकारे पाट्या लावणाऱ्या किंवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनात विरुद्ध कारवाई होताना अनेकदा दिसून आले असले तरी आमदारांची गाडी पोलिसांच्या नजरेतून सुटली कशी काय असा सवाल उपस्थित केल्या जात आहे.
◾ प्रकाश झोतात राहण्यासाठी केविलवाणी प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण व गट बाजी उफाळून आली असून त्याचा फटका आमदार सुनिल भुसारा यांना बसत आहे. त्यांनी गेल्या महिन्यात बोललेल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत काही जिल्हा परिषद सदस्यांनी दांडी मारून त्याचवेळी पक्षश्रेष्ठींची भेट घेऊन आमदारांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. काही प्रमाणात दिलजमाई करण्याचा प्रयत्न करण्यात आला असला तरीही आमदारांच्या कार्यपद्धतीला विरोध करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने प्रकाश झोतात राहण्यासाठी ही युक्ती करावी लागत असल्याचे खुद्द राष्ट्रवादी गोटातून सांगण्यात येते.