◾ सरावलीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना हजारो किलो तांदूळ, गहु व डाळीचा साठा सापडला; दुकान मालकांने दिले कमिशनवर रास्तधान्य दुकान चालवायला
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: पालघर तालुक्यात अनेकदा रास्तधान्याचा काळाबाजार टाळेबंदीत उघड झाला होता. मात्र आता बोईसर येथील रास्तधान्याचा मोठ्या प्रमाणात साधा बेकायदेशीर पणे ठेवल्याचे दिसून आले आहे. बोईसर मधील रास्तधान्याचे एक दुकान सरावली ग्रामपंचायत हद्दीतील एका ग्रामपंचायत सदस्यांच्या अनधिकृत इमारतीत ठेवल्याचे उघड झाले. महत्त्वाचे म्हणजे याच दुकानात काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी याअगोदर देखील करण्यात आल्या होत्या. मात्र तरीही बेकायदेशीर पणे रास्तधान्याचे दुकान फक्त पुरवठा अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असल्याचा आरोप नागरीकांन कडून होत आहे.
सरावलीच्या ओमसाई नगर भागात येथील उपसरपंच्याच्या मालकीच्या असलेल्या इमारतीवर पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाई दरम्यान याठिकाणी बोईसर हद्दीतील रास्तधान्याचे दुकान बेकायदेशीर पणे सुरू असल्याचे दिसून आले होते. तहसीलदार यांनी दुकान चालकाला तातडीने दुकान खाली करून बांधकाम तोडा असे आदेश महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याच ठिकाणी दिले. परंतु या ठिकाणी असलेल्या तिन गाळ्याचे टाळे खोलले असता याठिकाणी शेकडो टन अन्नधान्याचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी पालघर तहसीलदार यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना व पुरवठा अधिकाऱ्यांना अन्नधान्याचा पंचनामा करण्यासाठी सांगण्यात आले. मागच्या महिन्यात रेशनिंग धान्य वाटप केल्याची तारीख झाली असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात धान्याचा साठा कसा याबाबत खुद्द तहसीलदार देखील अचंबित झाले होते.
बोईसर भिमनगर येथील रास्तधान्याचे दुकान क्रमांक 3 हे संतोष दत्तात्रेय पाटील यांच्या नावाने असून प्रत्येक्षात हे दुकान एक परप्रांतीय चालवत आहे. पालघर तहसीलदार यांच्या समोर हा प्रकार उघडकीस आला असताना देखील तहसीलदार यांनी धान्याचा पंचनामा करा त्यानंतर कारवाई करू अशी भुमिका घेतली होती. याठिकाणी असलेल्या रास्तधान्य दुकानात तांदूळ, गहु व डाळीचा मोठा साठा असून साधारण एक हजार गोणी असल्याचे दुकान चालवत असलेल्या इसमाने तहसीलदार यांना सांगितले होते. यातच हे बोईसर येथील दुकान बेकायदेशीर पणे सरावलीच्या अनधिकृत वस्तीत सुरू असल्याचे अधिकाऱ्यांन समोर दिसून आले होते. तरीही अशा रास्तधान्याचा साठा बेकायदेशीर पणे गेल्या चार पाच वर्षापासून याभागात करून त्याचा काळाबाजार करण्यासाठी संगनमत करणाऱ्या माफियांना पुरवठा विभागाचे कसे अभय मिळते याचे उत्तम उदाहरण पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांच्या समोर उघडकीस आल्यानंतर दोन दिवस उलटून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.
◾पालघर तालुक्यातील पुरवठा अधिकारी हे फक्त कार्यालयात बसून कागदोपत्रीच नागरीकांचे धान्य वाटप झाल्याचे दाखवतात. याबाबत सुजाण नागरिकांनी आजवर उघड करून दिलेल्या काळाबाजार प्रकरणात उघड झाले आहे. रेशनिंग धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने अनेक युक्त्या लढवल्या आँनलाईन प्रणाली सुरू केली. परंतु धान्याचा काळाबाजार करणाऱ्या माफियांनी यावर देखील शक्कल लढवत धान्याचा काळाबाजार सुरूच ठेवला आहे. गरीब नागरीकांच्या नावाने आलेल्या धान्याचा काळाबाजार करून ते चढ्या भावाने विकले जाते. संपूर्ण यंत्रणा यामध्ये शामिल असल्याने तक्रारी करून देखील पुरवठा विभाग व तहसीलदार यावर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करताना दिसत नसल्याचा आरोप नागरिकांन कडून केला जात आहे.
◾ सरावलीच्या ओमसाई नगर भागात बेकायदेशीर पणे सुरू असलेल्या रास्तधान्याचे दुकान व याठिकाणी सापडलेला हजारो गोणी धान्याचा साठा याबाबत प्रतिक्रिया जाणुन घेण्यासाठी पालघर तालुका पुरवठा अधिकारी शामिली धोपाडे यांना वारंवार संपर्क साधून देखील संपर्क होऊ शकला नाही. तसेच याबाबत पालघर तहसीलदार सुनील शिंदे यांना संपर्क साधून प्रतिक्रिया जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पुरवठा अधिकारी यांच्या कडून माहिती घेऊन सांगतो असे सांगितले मात्र सायंकाळी उशिरा पुन्हा संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.