◾ सरावलीच्या संजयनगर भागातील सरकारी जागेवर होणार ग्रामीण रुग्णालय; पालघर महसूल विभागाकडून जिल्हाधिकारी यांच्या कडे प्रस्ताव सादर
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बोईसर ग्रामीण रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला असून सरावलीच्या संजयनगर येथील शासकीय जागा रुग्णालयासाठी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येथील जागेवर भुमाफियांचा डोळा असल्याने याठिकाणी राजकीय नेत्यांना हाताशी धरून एका माफियांने ही जागा बळकावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याच ठिकाणी सुसज्ज रुग्णालयात होणार व्हावे यासाठी अनेकदा वृत्त प्रसिद्ध करून त्यांचा पाठपुरावा केला होता.
बोईसर ग्रामीण रुग्णालयाची भाडेतत्त्वावर असलेली इमारत मोडकळीस आल्याने सद्या बोईसर ग्रामीण रुग्णालय इतरत्र नेण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र जागेचा तिडा कायम असल्याने बोईसरची आरोग्य वेवस्था लालफितीत अडकलेली दिसून येते. बोईसर मधील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या यासाठी चित्रालय भागातील सरकारी जागेवर दोन वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले होते. ही जागा महसूल विभागाने आरोग्य विभागाकडे वर्ग देखील केली होती. परंतु बीएआरसी प्रकल्पाने या जागेचा दावा केल्याने प्रकरण न्यायालयात गेल्याने ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला स्थगिती आली होती. यामुळे ग्रामीण रुग्णालय येणार आणि आरोग्याचा प्रश्न मिटणार अशा आशेने असलेल्या बोईसर वासीयांचा भ्रमनिरास झाला होता.
सरावली संजय नगर भागातील महाराष्ट्र शासनाची असलेल्या सर्वेनंबर 104 (अ) अडीच हेक्टर जागेवर भुमाफियांनी काही प्रमाणात अतिक्रमण केले आहे. तसेच स्थानिक राजकीय नेत्यांना हाताशी घेऊन भुमाफियांनी ही मोक्याची जागा बळकवण्यासाठी प्रयत्न केला होता. याठिकाणी अनधिकृत मंदिर बांधून जागा ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या भुमाफियांचा पर्दाफाश लोकसत्ताने करून याठिकाणी असलेल्या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाला भाग पाडले होते. तसेच याठिकाणी ग्रामीण रुग्णालय बांधकाम करता येईल असे वृत्ताच्या माध्यमातून विषय मांडला होता. याची दखल घेत प्रशासनाने हालचाली सुरू करत स्थानिक आमदारांनी देखील प्रत्येक्षात जागेवर जाऊन पाहणी केली होती.
◾बोईसर मंडळ अधिकारी कार्यालयातुन तातडीने जागा ग्रामीण रुग्णालयाला देण्याबाबत अहवाल 18 जानेवारी रोजी पालघर तहसीलदार यांच्या कडे पाठविण्यात आला असून पालघर तहसीलदार यांच्या कडून हा अहवाल दोन दिवसातच पालघर जिल्हाधिकारी यांच्या कडे पाठवुन जागा मंजूर होण्यासाठी प्रयत्न जोमाने सुरू करण्यात आले आहेत. यामुळे येत्या काही महिन्यात ग्रामीण रुग्णालयाचे काम प्रत्येक्षात सुरू होण्याची शक्यता आहे.