◾ सरावलीच्या अनधिकृत वस्तीतील उकिरडे रस्त्यावर; घाणेरड्या वासामुळे नागरिक हैराण
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: सरावलीच्या अनधिकृत वस्तीतील कचरा आता मुख्य रस्त्यावर टाकला जात असून याकडे ग्रामपंचायतीने देखील दुर्लक्ष केले आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येथील घनकचरा टाकला जात असल्याने रस्त्याला कचराभूमीचे स्वरूप आले आहे. रस्ता औद्योगिक क्षेत्राचा म्हणून त्यांनी ही घाण उचलावी असे बेजबाबदार उत्तर येथील मस्तावलेले ग्रामविकास अधिकारी देत असल्याने याचा नाहक त्रास सर्वसामान्य रस्त्यावरून चालणाऱ्या नागरिकांना होत आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्राच्या बाजूला आझाद नगर, राऊत वाडी भागात सरकारी जागेवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळीचे बांधकाम करण्यात आले आहे. अशा अनधिकृत चाळींना ग्रामपंचायत सहकार्य करत असून येथील घाण मात्र अशीच रस्त्यावर पडलेली असताना कोणत्याही साफसफाई ग्रामपंचायत कडून केली जात नाही. याभागात हजारो लोक भाडेकरू तसेच काही स्वतः मालकी चाळीच्या घरात राहतात. घरातून निघणारा कचरा रात्रीच्या वेळी व दिवा देखील औद्योगिक क्षेत्राच्या रस्त्यावर फेकला जातो. ग्रामपंचायत याठिकाणी पडलेला कचरा उचलत नसल्याने कचरा सडून त्याचा घाणेडा वास येतो. रस्त्यावर चालणे तर सोडा याठिकाणी कोणाला वाहन घेवून जाता सुध्दा येत नसल्याने याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. प्रचंड प्रमाणात असलेल्या माशा यामुळे याठिकाणाहुन जाणाऱ्या नागरिकांना त्याला त्रास सहन करावा लागतो. असे असले तरी लाखो रूपये कागदावर खर्च दाखवणारी सरावली ग्रामपंचायत नेमकी काय स्वच्छता करते हे अशा प्रकारामुळे दिसून येते.
सरावली ग्रामपंचायत हद्दीतील कचरा उचलण्यासाठी वाहनांची व्यवस्था ग्रामपंचायत कडून केली असून लाखो रूपये महिन्याला यासाठी खर्च दाखवला जातो. मात्र प्रत्येक्षात अनेक भागात मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याचे दिसून येते. औद्योगिक क्षेत्रातील टीमा हाँल याठिकाणी देखील अशाच प्रकारचा कचरा रोज टाकलेला दिसून येतो. याबाबत सरावलीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष किणी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रस्त्यावर कचरा आहे तो त्यांनी साफ करायचा, तसेच महामंडळ औद्योगिक क्षेत्रातील कर वसुली करून त्यातील 50 टक्के रक्कम ग्रामपंचायतला देते. अर्धी रक्कम त्यांच्या कडे असे त्यामुळे आता रस्त्यावर असलेला कचरा त्यांनी उचलावा असे बेजबाबदार उत्तर देत. नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. यामुळे अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांना पालघर गटविकास अधिकारी यांनी तरी स्वच्छतेचा धडा शिकवावा अशी मागणी नागरिकांन कडून केली जात आहे.
◾ आझाद नगर भागातील रस्त्यावर जमा असलेला कचरा शुक्रवारी सकाळी पेटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न ग्रामपंचायत कडून करण्यात आला. कचऱ्यात असलेले प्लॅस्टिक काही प्रमाणात जळल्याने याभागात मोठ्या प्रमाणात धुर प्रसरला होता. असे असले तरी जिल्हा परिषद निवडणूकीत अनधिकृत वस्तीतील मतांची गणिते मांडणारे व आता निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांना नागरिकांना होणाऱ्या त्रासाची फिकीर नसल्याने दिसून येते.
◾ग्रामपंचायतीने हा कचरा उचले गरजेचे असून याबाबत सरावली ग्रामपंचायतीला पत्र दिले जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे कचरा उचलण्याची कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने हा कचरा ग्रामपंचायतीने उचलावा.
— संदीप बडगे, उपकार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तारापूर