◾पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न; परिषदेची कार्यशाळा बोईसर मध्ये पार पडली
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: पालघर जिल्ह्यात पत्रकारांच्या अनेक संघटना असल्या तरी पत्रकार घडावा यासाठी कार्य करणारी संघटना म्हणून मराठी पत्रकार परिषदेच्या पालघर विभागाने आपली वेगळी छाप पाडली आहे. पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या तरूणांना व पत्रकारिता करत असलेल्यांना देखील योग्य मार्ग म्हणून पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याबाबत पत्रकारिता कार्यशाळा बोईसर मध्ये पार पडली आहे.
मराठी पत्रकार परिषद, मुंबई चे सरचिटणीस व दैनिक राजतंत्र चे संपादक संजीव जोशी यांनी कायद्याचे ज्ञान व योग्य पत्रकार घडावा यासाठी कार्यशाळा सुरू केल्या आहेत. पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने मार्फत सुरू केलेल्या कार्यशाळा राज्यात प्रथमच अशा प्रकारचा प्रयोग पत्रकार संघटनेने सुरू केला आहे. यामुळे पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या व इतर शिक्षण घेऊ न शकलेल्या गरजवंतांना हा मोठा उपयोग होत आहे. संजीव जोशी यांनी याबाबत टाळेबंदीत आँनलाईन पध्दतीने पत्रकारिता कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला विविध क्षेत्रातील नामवंत लोकांना सहभागी होऊन पत्रकार क्षेत्रात येण्याची पहिली पायरी पार पाडली आहे. अशाच प्रकारची दुसरी कार्यशाळा बोईसर येथे पार पडली असून या कार्यशाळेला देखील पत्रकारिता क्षेत्रात येणाऱ्या नवीन व सद्या पत्रकारिता करत असलेल्या पत्रकारांनी देखील सहभाग नोंदवला होता.
पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून 23 जानेवारी रोजी बोईसर येथील पालघर दर्पण कार्यालयात पत्रकारिता कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी पत्रकारिता आवश्यक गुण, शैक्षणिक पात्रता, विशेषाधिकार, भारताचे संविधान तोंडओळख, प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया व त्याची कार्यपद्धती, प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने निर्देशित केलेली मार्गदर्शक तत्वे, पोलीस प्रशासन व भारतीय दंड संहिता, अब्रूनुकसानीचे दावे व पत्रकारिता, पंचायत राज व्यवस्था अशा महत्त्वाच्या विषयावर संजीव जोशी यांनी मार्गदर्शन केले. तसेच याबाबत दुसऱ्या दिवशी आँनलाईन पध्दतीने देखील कार्यशाळा पार पडली असून बातमी लेखनाची तत्वे, बातमी लेखनाचे तंत्र याबाबत विशेष कार्यशाळा घेतली जाणार आहे.
या कार्यशाळेत महत्त्वाचे म्हणजे बोईसर येथील जेष्ठ पत्रकार पंकज राऊत यांनी कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग घेत एक वेगळा आदर्श पत्रकारांन पुढे त्यांनी ठेवला. आपण जेष्ठ असलो तरी हा उपक्रम व कार्यशाळेत देण्यात आलेली माहिती खुपच उपयुक्त व ज्ञान वाढविणारी असल्याचे त्यांनी सांगत कार्यशाळेचे त्यांनी कौतुक केले. यावेळी पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हर्षद पाटील, उपाध्यक्ष हेमेंद्र पाटील आदी उपस्थित होते.