◾सामाजिक कार्यकर्त्यांचे जनतेला आवाहन
पालघर दर्पण: रमेश पाटील
वाडा: ग्रामपंचायतीची निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षांच्या निशाणीवर लढली जात नसली, तरी काही राजकीय पक्ष या निवडणुकीत पक्षीय राजकारण आणुन गावागावात भांडणे लावण्याचे काम करीत असतात. यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळत नाही. यापुढे गावातील स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षीय राजकारण करणा-यांना थारा देऊ नये असे मत वाडा, विक्रमगड तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
वाडा, विक्रमगड या दोन तालुक्यातील शंभरहून अधिक ग्रामपंचायतींच्या येत्या दोन महिन्यांत मुदत संपत आहेत. या ग्रामपंचायतीच्या निवडणुका येत्या एप्रिल-मे महिण्यात होण्याची शक्यता आहे. येत्या दोन महिन्यांत होणा-या ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे. काही राजकीय पक्षांनी गावोगावी जाऊन बैठका घेणे सुरु केले आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्या आधीच गावागावांतील वातावरण तापू लागले आहे.
पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड,जव्हार, मोखाडा हे चारही तालुके आदिवासी उपयोजना क्षेत्रात येत असल्याने या चारही तालुक्यात ग्रामीण, आदिवासी भागाच्या विकासासाठी दरवर्षी विविध योजना अंतर्गत ग्रामपंचायतींना करोडो रुपयांचा निधी येत असतो. त्यामुळे ग्रामपंचायतींचे पदाधिकारी होण्यासाठी चढाओढ लागते. प्रत्येक गावात आपल्याच पक्षाची ताकद राहण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीत राजकीय पक्षांचे पुढारी गावागावात फिरून निवडणुकीच्या माध्यमातून भावा-भावात भांडणे लावून देत असतात. या भांडणामुळे गावात दोन तट निर्माण होतात व गावाचा विकास मंदावला जातो. म्हणुन ग्रामपंचायतीच्या येणाऱ्या निवडणुका ह्या पक्ष विरहित व्हाव्यात असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
◾गावातील स्थानिक नागरिकांनी एकत्रित येऊन बहुमताने आपला प्रतिनिधी शक्यतो बिनविरोध निवडावा
— निलेश सांबरे, उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर
◾ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षीय राजकारण येत असल्यानेच गावातील वातावरण दुषित होते.
— परशुराम सावंत, सेवानिवृत्त प्राचार्य, रा. अंबिस्ते. ता.वाडा.
◾ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी स्थानिकांनी पक्षीय राजकारणापासून दूर रहावे
— श्रीकांत भोईर, सामाजिक कार्यकर्ते, कुडूस, ता. वाडा.