पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाची कारवाई.
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: मयत शेतकऱ्याच्या शवविच्छेदन अहवालासाठी लाच मागणारा मनोर ग्रामीण रुग्णालयाचा वैद्यकीय अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला आहे. चार हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना मनोर ग्रामीण रुग्णालयाचा हंगामी वैद्यकीय अधिकारी आणि त्याच्या सहकारी डॉक्टरला सोमवारी (ता.25) सायंकाळी अटक करण्यात आली आहे.
पाण्याने भरलेली सिमेंटची टाकी फुटून अंगावर पडल्याने डिसेंबर महिन्यात सावरे गावातील एका आदिवासी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.मयत शेतकऱ्याचे शवविच्छेदन मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले होते.शवविच्छेदन अहवालावर स्वाक्षरीसाठी शेतकऱ्याच्या नातेवाईकांकडून मनोर ग्रामीण रुग्णालयाचे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी स्वप्नील बोदमवाड यांनी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती चार हजार रुपयांवर बोलणी पक्की झाली होती.शेतकऱ्याच्या नातेवाईकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचण्यात आला होता.
सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास मनोर ग्रामीण रुग्णालयात चार हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना डॉ स्वप्नील बोदमवाड आणि त्याचा सहकारी नितेश पांडे याला पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.