पालघर दर्पण : प्रतिनिधी
मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत लवकरच उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
मंत्रालयात अनुदानित वसतिगृहांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, विभागाचे अधिकारी व कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुंडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणारी २३८८ अनुदानित वसतिगृहे कार्यरत आहेत. त्यामध्ये मुलींसाठी ५७८ व मुलांसाठी १८१०अनुदानित वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांची एकूण मान्य विद्यार्थी संख्या ९९ हजार ५५२ इतकी आहे.
या वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना मानधनाऐवजी वेतनश्रेणी लागू करण्याबाबत व अन्य मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. तसेच या बाबतीत वित्त विभागाशी लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे ही मुंडे यांनी यावेळी सांगितले.