◾दंड न आकारता दिले मोफत हेल्मेट,हेल्मेट वापरासाठी आवाहन
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: महामार्गावर विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना महामार्ग पोलिसांकडून गुलाबाचे फुल देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले आणि हेल्मेट भेट देत, हेल्मेट वापराचे आवाहन केले. गुरुवारी (ता.28)महामार्ग वाहतूक पोलीस उप अधीक्षक संदीप भागडीकर यांच्या उपस्थितीत दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.यावेळी दुर्वेस महामार्ग वाहतूक केंद्राचे प्रभारी प्रकाश दिंडे,मनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रताप दराडे आणि वाहतुक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
गुरुवारी सकाळी मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खनिवडे टोल नाक्याच्या मुंबई वाहिनीवर विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या सुमारे पन्नास दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी अडवले होते. यावेळी वाहतूक पोलीस उप अधीक्षक संदीप भागडीकर यांनी दुचाकीस्वारांना हेल्मेट वापराचे महत्त्व सांगून दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले.
दुचाकीस्वारांकडून पन्नास हजार ते लाख रुपये किंमतीच्या दुचाकीचा वापर केला जात असताना पाचशे ते हजार रुपयांचे हेल्मेट खरेदी करण्यासाठी टाळाटाळ केली जाते. परंतु हेल्मेटच्या वापरामुळे अपघातात अनेक दुचाकीस्वारांचे जीव वाचल्याचे उदाहरण प्रकाश दिंडे यांनी दिले.
यावेळी कारवाईसाठी अडविण्यात आलेल्या विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना महामार्ग पोलिसांकडून गुलाबाचे फुल देण्यात आले. त्यानंतर दुचाकीस्वारांना विनामूल्य हेल्मेट भेट देऊन हेल्मेटचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले. शुक्रवारपासून विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महामार्ग पोलिसांनी स्पष्ट केले.