◾ उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर दुरूस्तीचे काम सुरू असल्याने बोईसर सह सरावली ,खैरापाडा भागात विज पुरवठा झाला होता खंडित
पालघर दर्पण: प्रतिनिधी
बोईसर: महावितरणाच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर बिघाड झाल्याने बोईसर सह सरावली व खैरापाडा या संपूर्ण भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. खैरापाडा रेल्वे उड्डाणपूला जवळ जमीनी खाली असलेल्या विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याने बुधवारी दुपारी खंडित झालेला वीजपुरवठा 24 तास उलटून देखील सुरू झाला नसल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
बोईसर शहरात व आजुबाजुला असलेल्या गावांमध्ये वाढलेले नागरीकरण व असलेले उद्योग धंदे यासाठी या भागाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. याठिकाणी काही तास जरी विद्युत पुरवठा खंडित झाला तरी त्यांचा विपरीत परिणाम येथील जनजीवनावर पडतो. मात्र असे असले तरी एका विद्युत वाहिनीत झालेल्या बिघाडामुळे 24 तासा पेक्षा अधिक काळ येथील विद्युत पुरवठा खंडित झाला. खैरापाडा उड्डाणपूल जवळ जमीनी खालून गेलेल्या विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याचे महावितरणाच्या अधिकाऱ्यांना लक्षात आल्यानंतर गुरूवारी सकाळ पासुनच याभागात जमीनी खालून असलेल्या वाहिनीत नेमका बिघाड कुठे आहे याचा शोध घेतला जात होता. दुपार नंतर बिघाड झालेल्या भागाची खात्री झाल्यानंतर याठिकाणी खोदकाम करून उच्च दाब वाहिनीची दुरूस्ती हाती घेण्यात आली होती. मात्र दुरूस्ती मध्ये विलंब लागत असल्याने गुरुवारी 28 जानेवारी रोजी सायंकाळी पर्यंत देखील विद्युत पुरवठा सुरू झाला नव्हता. तसेच याठिकाणी लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरू व्हावा यासाठी महावितरणाचे अधिकारी कर्मचारी युध्द पातळीवर काम करत असल्याचे दिसून आले. याबाबत महावितरणाचे उपअभियंता रूपेश पाटील यांना संपर्क साधला असता त्यांनी साधारण सायंकाळी सात वाजेपर्यंत विद्युतपुरवठा सुरू होईल असे सांगितले त्यानुसार सायंकाळी विद्युतपुरवठा सुरू झाला.