◾वाडा पोलीसांच्या दुर्लक्षाबद्दल खासदारांची तिव्र नाराजी
पालघर दर्पण: रमेश पाटील
वाडा: बनावट नोटांची छपाई करून या नोटांची मुंबई शहरात विक्री करणा-या वाड्यातील एका टोळीचा पर्दाफाश घाटकोपर (मुंबई) च्या गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी (25 जानेवारी) केला. वाडा पोलीस ठाण्यापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर सुरु असलेल्या या गोरख धंद्याविषयी वाडा पोलीसांना माहिती नसने या बाबत आश्र्चर्य व्यक्त केले जात आहे.
वाडा शहरातील शिवाजी नगर परिसरात या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी महेंद्र खांडसकर एका भाड्याच्या घरात राहत आहे. या घरातच खांडेकरांनी आणखीन तिघांची सोबत घेऊन बोगस नोटा बनविण्याचा गोरख धंदा सुरु केला होता.
घाटकोपर युनिटच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी शिवाजी नगर परिसरात रहात असलेल्या महेंद्र खांडसकर यांच्या घरी छापा टाकल्यानंतर पोलिसांना या ठिकाणी दोन हजार, पाचशे, दोनशे, आणि शंभर रूपयांच्या 35 लाख 54 हजार रुपयांच्या बनावट नोटा व त्या तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले.
विशेष म्हणजे हा छापखाना वाडा पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर (300 ते 350 मीटर) असूनही वाडा पोलिसांना त्याची काहीच कल्पना नसल्याचे आश्चर्य वाटत आहे. गुरुवारी वाडा येथे खासदार राजेंद्र गावित यांनी घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. घाटकोपरचे पोलिस वाड्यात येऊन बोगस नोटा बनविण्याचा छापखाना उध्वस्त करतात, आणि वाड्याचे पोलीस झोपा काढतात काय, अशा शब्दात गावित यांनी वाडा पोलीसांची कान उघडणी केली.
या प्रकरणी घाटकोपर पोलीसांनी अब्दुला कल्लू खान, महेंद्र तुकाराम खांडसकर, अमीन उस्मान शेख, फारूख रसूल चौधरी या चौघांना अटक केली आहे. या चारही आरोपींना 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.