■शेतकरी आंदोलना बाबत चुकीची माहिती पसरवणारी पाकिस्तानी ट्विटर अकाऊंट बंद करा; सरकारचा ट्विटर ला प्रस्ताव
पालघर दर्पण : प्रतिनिधी
मागे गेल्या काही दिवसांमध्ये ट्विटर वरून चुकीची माहिती पसरवण्यात आली होती. त्याच बरोबर किसान नरसंहार सारखे हॅशटॅग देखील वापरण्यात आले होते. त्यामुळे केंद्र सरकारने २५० ट्विटर अकाउंट्स ब्लॉक करण्याचा प्रस्ताव गेल्या गुरुवारी ट्विटरकडे दिला होता. मात्र अद्यापही यावर कार्यवाही केलेली नाही असे दिसून येते आहे.
कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. या आंदोलना जवळपास २ महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले असून अनेक बैठकी देखील झाल्या मात्र तरी देखील अद्याप तोडगा निघत नाही. त्यातच प्रजसत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचार नंतर शेतकऱ्यांचे आक्रमक रूप पाहायला मिळाले. पोलीस व शेतकरी यांच्यातील हिंसाचार नंतर आंदोलनाने आक्रमक वळण घेतले. यातच अनेक बॉलिवूड तसेच हॉलिवूड सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला तर काहींनी यावर विरोध दर्शवला. त्यावर पवारांनी देखील आपली शेतकऱ्यांच्या बाजूने आपली प्रतिक्रिया मांडली होती.
यातच आता ट्विटर वरून देखील शेतकरी आंदोलन या विषयावर अनेकजण ट्विट करीत आहेत. मात्र भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन बाबत चुकीची व प्रक्षोभक माहिती पसरविण्यात येत आहे. गृह मंत्रालयाच्या एका अहवालानुसार माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने ही मागणी केली होती की, नव्या यादीत खलिस्तान्यांप्रती सहानुभूती दाखवणारे आणि पाकिस्तानशी संबंधित अकाउंट्सचाही समावेश आहे. तसेच काही स्वयंचलित चॅटबॉट आहेत ज्यांचा वापर शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान चुकीची सूचना देण्यासाठी करण्यात येत आहे. शेतकरी आंदोलनाबाबत चुकीची आणि प्रक्षोभक माहिती पसरवणारी १,१७८ पाकिस्तानी ट्विटर अकाउंट्स बंद करण्याचे निर्देश केंद्र सरकारने ट्विटरला दिले आहेत. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.