◾अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी मांडली भुमिका; राज्य भरातील पत्रकार उपस्थित
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
पालघर: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा बोर्डी येथे पार पडला. पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेने सोहळ्याचे दिमाखदार संयोजन केले होते. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी रोखठोपणे पत्रकारितेवर भाष्य केले. एक वेळ तलवारीची ताकद कमी केली तरी चालेल, मात्र लोकशाही मध्ये लेखणीची ताकद व पत्रकारांची ताकद कमी करणे हा खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे असे विचार पटोले यांनी मांडले.
7 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात राज्यभरातून जवळपास 200 पत्रकारांनी सहभाग घेतला होता. बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतीला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी अध्यक्षस्थान भूषविले. मुख्य अतिथी म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोळे उपस्थित होते. मुख्य वक्ते, माध्यम तज्ञ समिरण वाळवेकर यांनी सद्याची सुरू असलेली पत्रकाराता व वृत्तपत्र मालकांकडून पत्रकारांना बातम्या पेक्षा जाहिराती गोळा करण्याचे लावले जाणारे काम याबद्दल भाष्य करीत सध्याची वस्तुस्थिती समोर आणली. यातच स्थानिक वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या अधिकच महत्त्वाच्या असल्याचे मत मांडताना वाडा येथे बनावट नोटांबाबत बातमी स्थानिक वृत्तपत्रात वाचली, मात्र हा विषय राज्यात कुठेही मोठ्या वर्तमान पत्रात दिसला नाही असेही सांगितले.
पुरस्कार सोहळ्यात बोलताना नाना पटोले यांनी पत्रकार हा कधीच माजी होत नाही माजी तर आम्ही होतो. दोन दिवसांपूर्वी मी विधानसभा अध्यक्ष होतो, आता माजी विधानसभा अध्यक्ष आहे. मात्र पत्रकार हा कधीच माजी होत नाही. कारण आपल्या लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये चौथ्या स्तंभाचे महत्व हे नेहमी अबाधित राहिलेलं आहे. त्यामुळे अशा व्यवस्थेला माजी हा शब्द लागू शकत नाही असे नाना पटोले यांनी सांगितले. चौथा स्तंभ हा समाजाचा आरसा असून तसाच तो प्रशासकीय व्यवस्थेचा व राजकीय व्यवस्थेचा आरसा मानला जातो. पत्रकारांच्या पेनाला तलावरी सारखी धार असते असे देखील बोलले जाते. आमच्या खेड्यापाड्यातील, शहरातील पत्रकार हा पत्रकारिता करण्यासाठीच आलेला आहे. मात्र पत्रकारितेत व्यवसायिकरण आले आणि पत्रकारितेचे स्वरूप बदलले असे नाना पटोले यांनी सांगितले.
असे बोलले जाते पत्रकार हा कोणाची फडशा पाडू शकतो. मात्र या कलीयुगात खरी पत्रकारिता करत असताना जर त्या पत्रकारावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा लागू होत असेल तर ही चिंतनात्मक बाब आहे. अशी व्यथा त्यांनी मंचावर व्यक्त केली. तसेच तुमची लेखणीची धार अशीच कायम असावी अस सांगत पुढे नाना पटोले म्हणाले की, माझं चुकलं तर पत्रकारांनी चुकलं असेच लिहा. उलट लेखणीची ताकद जो कोणी कमी करत असेल त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. असे सांगत एक वेळ तलवारीची ताकद कमी केली तरी चालेल मात्र लोकशाही मध्ये लेखणीची ताकद व पत्रकारांची ताकद कमी करणे हाच खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे असे सांगितले.
मराठी पत्रकार परिषदे तर्फे दिला जाणारा रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाला देण्यात आला. तसेच वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार अक्कलकोट तालुका मराठी पत्रकार संघ, निपाणी तालुका मराठी पत्रकार संघ, रत्नागिरी तालुका मराठी पत्रकार संघ, धुळे तालुका मराठी पत्रकार संघ, दारव्हा तालुका मराठी पत्रकार संघ, सावली तालुका मराठी पत्रकार संघ, गेवराई तालुका मराठी पत्रकार संघ व चाकूर तालुका मराठी पत्रकार संघ या पत्रकार संघाना पुरस्कार देण्यात आला. यावेळी खासदार राजेंद्र गावित,आमदार श्रीनिवास वनगा, आमदार राजेश पाटील, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष विजय पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यश विजय जोशी, पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष हर्षद पाटील, सरचिटणीस वैभव पालवे, संयोजन समितीचे अध्यक्ष नीरज राऊत, ज्येष्ठ पत्रकार अच्युत पाटील, पी. एम. पाटील, उपाध्यक्ष हेमेंद्र पाटील, प्रमोद पाटील, शशिकांत कासार, प्रदीप राऊत, रुपेश मोकाशी आदी मान्यवर उपस्थित होते.
◾विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष मंदार पारकर यांच्या सह अनेक ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार यावेळी परिषदेच्या वतीने करण्यात आला. शिवाय परिषदेच्या चळवळीचा हातभार लागावा या भावनेने पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने 1 लाख एक हजार रुपयांची रक्कम मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांना सुपूर्त करण्यात आली. उत्तम नियोजन, या न भूतो न भविष्यती असा भव्य दिव्य कार्यक्रम पालघरमध्ये पार पडला असून याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.