◾ बोईसर पुर्वेकडील बेसुमार खदानींना उत; अर्थकारणाने खदानमाफियांना खुले रान
◾ हेमेंद्र पाटील
पालघर तालुक्यात अनधिकृत कामांना मोठी चालना मिळालेली दिसून येते याठिकाणी अनधिकृत बांधकामे जोमाने सुरू असली तरी दुसऱ्या बाजूला बेकायदेशीर खदानी दिवसेंदिवस खोल जात असलेल्या दिसतात. तरीही पालघर महसूल विभागाचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष का करतात हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. महसूल विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत नसुन सोईनुसार तडजोड करून अशा माफियांना मोकळीक दिली जाते. हा आरोप अनेक वेळा बातमीच्या माध्यमातून करण्यात आला असून ही वस्तुस्थिती आहे. मात्र जिल्हा प्रशासन अशा माफियांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही हे मोठे दुर्भाग्य आहे.
पालघर तालुक्यातील बोईसर पुर्वेकडील असलेल्या अनधिकृत खदानींना महसूल विभागाने पुन्हा सुरू करण्यासाठी मोकळीक दिली आहे. काही दिवसांपूर्वी याभागातील अनधिकृत सुरू असलेल्या खदानींचा विषय पुढे आल्यानंतर पालघर तहसीलदार यांनी नाईलाजाने सर्व खदानींचे उत्खनन बंद करण्याचे आदेश काढले होते. मात्र प्रांत अधिकारी यांनी नागझरी येथील एका खदानीला परवाना दिल्याने येथील बेकायदेशीर खदानींनी देखील उत्खनन सुरू केले होते. बेकायदेशीर उत्खनन सुरू असताना देखील बोईसर विभागाच्या महसूल अधिकाऱ्यांनी फक्त आर्थिक दबावाखाली येऊन याठिकाणी सोईस्करपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले होते. यासाठी असलेल्या सर्वे नंबर 150 मधील शासनाने शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जागेवर भुमाफियांनी बेसुमार खोदकाम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी तक्रार करून देखील महसूल विभागाने कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही. उलट तुमच्या जागा सरकार जमा करू असा सज्जड दम शेतकऱ्यांना देण्यात आला होता. यावरून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना किती मस्ती उफाळून आली आहे हे दिसून येते.
बोईसर पुर्वेकडील नागझरी, लालोंडे, निहे, किराट व गुंदले, गरवाशेत या संपूर्ण भागात नियमबाह्य खदानी सुरू आहेत. खनिकर्म विभागाचे नियम डावळून महसूल विभाग अशा खदानींना नियमांना बगल देत खोदकामाची परवानगी देत आले आहेत. या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत खदानी खोदकाम सुरू असले तरी याठिकाणी असलेले तलाठी, मंडळ अधिकारी अशा खदानींवर कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. यातच सर्वे नंबर 150 मध्ये सुरू केलेल्या खदानी कडे स्थानिक अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष हे फक्त आर्थिक दबावामुळे केल्याचा आरोप तक्रारदार शेतकऱ्यांन कडून करण्यात आला होता. तरीही अशा गंभीर प्रकरणाची साधी चौकशी देखील करण्यात आली नाही. पालघर तहसीलदार सुनिल शिंदे यांनी मागील महिन्यात येथील सर्व नियमबाह्य खदानी बंद केल्या होत्या. मात्र महसूल विभाग अशा कोणत्या दबावाखाली आला की याठिकाणी जोमाने बेकायदेशीर खदानी पुन्हा सुरू झाल्या. याचा मागोवा पालघर जिल्हाधिकारी यांनी घेणे गरजेचे आहे.
महसूल विभागाचे अधिकारी आपल्या खास खदान माफियांना कशा प्रकारे मोकळीक देतात हे अनेकदा दिसून आले आहे. असाच प्रकार नागझरी याठिकाणी घडला असून येथील तहसीलदार यांनी बंद केलेल्या खदानीला प्रांत अधिकारी पालघर यांच्या कडून स्वामित्वधनाचा परवाना मिळाला होता. यामुळे आजूबाजूला असलेल्या सर्व बेकायदेशीर खदानी देखील पुन्हा जोमाने सुरू करण्यात आल्या होत्या. यामुळे एक अधिकारी खदानीवर कारवाई बाबत अहवाल जरी देत असला तरी दुसरा अधिकारी स्वामित्वधनाचा परवाना देतो यामुळे बेकायदेशीर खदानींना मोकळे रान मिळाले होते. यामुळे महसूल विभागाचे झोल पालघर जिल्हाधिकारी कशा प्रकारे उघड करतात व महसूल विभागाचे आशिर्वाद असलेल्या माफियांवर काय कारवाई करतात हे पाहत राहणेच औचित्याचे ठरेल.