पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: पालघर ग्रामीण जिल्ह्यात हत्यांचे सत्र लागोपाठ सुरूच आहे. गेल्या चार दिवसात लागोपाठ चार हत्या झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरत आहे. यामध्ये भारतीय नौसैनिक हत्याकांड ही थरकाप उडवणारी घटना होती. सैनिकाच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळल्याने हे प्रकरण संपूर्ण देशभर गाजत आहे.
पाच जानेवारी रोजी सुरजकुमार दुबे या नौसैनिकाला तलासरी तालुक्यातील वेवजी वैजलपाडा गाव हद्दीतील डोंगराळ जंगलात आणून त्यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत जाळण्यात आले.उपचारार्थ नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.ही घटना अमानवीय कृत्य करणारी होती.या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली गेली.या प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता सुरजकुमार वापरत असलेल्या दोन भ्रमणध्वनी क्रमांकाच्या व्यतिरिक्त एक भ्रमणध्वनी क्रमांक आढळून आला ज्याची माहिती त्याच्या घरच्यांना नव्हती.या क्रमांकातून त्याने शेयर बाजाराचे व्यवहार केल्याचे समोर आले.तसेच आपल्या सहकारी व इतरांकडून त्याने हात उसने पैसे घेतल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.या प्रकरणात घोलवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून जिल्हा पोलिसांनी शंभर अधिकारी-कर्मचारी यांची विविध पथके तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
या घटनेला एक दिवस उलटत नाही तोच वाडा पोलीस ठाणे हद्दीतील तुंबडेपाडा या गावात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली.वाडा उमरोठे येथील राहणारा करण रेंजड या विवाहित पुरुषाचे एका अन्य महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यातून त्याचा खून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. करणच्या डोक्यावर हत्याराने वार करून त्याला जीवे ठार केल्याने खून केल्याचा गुन्हा वाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे.याप्रकरणीही पोलिसांचा तपास सुरू आहे.
रविवारी संध्याकाळी अनैतिक संबंधातून पतीने आपल्या पत्नीला व तिच्या प्रियकराची डोक्यात कुर्हाडीचे घाव घालून दोघांचीही हत्या केल्याचे सफाळे येथे उघड झाले आहे.मनोर तर्फे दहिसर गावातील पांडू बाळकृष्ण श्रावणे व ठाकूर पाडा येथील संगीता दिलीप ठाकरे या विवाहितेचे प्रेम संबंध होते.हे दोन्ही मयत एकमेकांचे नातेवाईक होते. ठाकुरपाडा येथील राहत्या घरात संगीता व तिच्या प्रियकराला आरोपी पती दिलीप तानाजी ठाकरे याने दोघांनाही संबंध करताना रंगेहाथ पकडल्यानंतर रागाच्या भरात घरात असलेल्या कुऱ्हाडीचा दांड्याने संगीता व पांडू या दोघांच्याही डोक्यात घाव घालून दोघांनाही जागीच ठार केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. आरोपी दिलीप ठाकरे याला सफाळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस पुढील तपास करीत आहे.