अंगणवाडीची इमारत मोडकळीस आली असल्याने बालकांना बसण्यासाठी धोकादायक.
पालघर दर्पण: वार्ताहर
मनोर: अंगणवाडी शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. तसेच गेल्या दहा वर्षांपासून नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने गावातील समाज मंदिराच्या इमारतीमध्ये अंगणवाडी भरवली जात आहे.समाज मंदिरात विजेचे कनेक्शन नसल्याने बालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून अंगणवाडीसाठी नवीन इमारत बांधण्याची मागणी केली जात आहे.
दहिसर तर्फे मनोर गावामध्ये चार अंगणवाड्या आहेत. चार पैकी तीन अंगणवाड्यांच्या इमारतींचे नवीन बांधकाम करण्यात आले आहे.गावातील सर्वात पहिल्या अंगणवाडी शाळा क्रमांक एक ची इमारत धोकादायक झाली असून मोडकळीस आली होती.त्यामुळे तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने लगतच्या समाज मंदिरात अंगणवाडी भरवण्यास सुरुवात केली होती.तसेच नवीन इमारत बांधकामासाठीचा प्रस्ताव ग्रामपंचायती मार्फत एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाकडे पाठविण्यात आला होता.परंतु नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने गेल्या दहा ते बारा वर्षांपासून अंगणवाडी शाळा क्रमांक एक समाज मंदिरात भरवण्यात येत आहे.समाज मंदिरात वीज पुरवठा नसल्याने बालकांची गैरसोय होत आहे. ग्रामस्थांकडून अंगणवाडी साठी नवीन इमारत बांधून देण्याची मागणी केली जात आहे. परंतु एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाकडून ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. दहिसर गावातील अंगणवाडी शाळा क्रमांक एक ची मोडकळीस आलेली इमारत पाडून,त्याठिकाणी नवीन इमारत बांधण्याची मागणी जोर धरत आहे.
◾दहिसर गावातील अंगणवाडीची नवीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठविण्यात आला आहे.नुकताच मनोर प्रकल्प विभागाचा कार्यभार स्वीकारल्याने दहीसरच्या अंगणवाडी शाळेच्या इमारतीसाठी दहा वर्षांपासून निधी उपलब्ध होऊ शकला नाही,याबाबत माहिती देता येणार नाही.
— रुपाली धुमाळ,
एकात्मिक प्रकल्प अधिकारी, मनोर.