◾ प्रदूषण उघड झाले असतानाही कारवाईसाठी चालढकल
◾बड्या उद्योजकांच्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेले दुर्लक्ष संशयास्पद
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सोईस्करपणे निवडक बड्या उद्योजकांना मोकळीक देण्याचा प्रयत्न केला आहे. तारापूर मधील प्रदूषणकारी कारखान्याचे रासायनिक प्रदूषण उघड झाले असताना देखील त्यावर कारवाई साठी दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला असताना देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. एखाद्या लहान उद्योगावर कारवाईचा बडगा दुसऱ्या दिवशी उगारला जात असला तरी बड्या उद्योजकांच्या रासायनिक प्रदूषणावर फक्त आर्थिक दबावामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांन कडून केला जात आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सर्वात प्रदूषणकारी कारखाना म्हणून आरती ड्रग्ज कारखान्याला कोट्यवधी रूपयाचा दंड ठोकवला असला तरी या उद्योजकांने आपले रासायनिक प्रदूषण सुरूच ठेवले आहे. हजारो टन रासायनिक घनकचरा कारखान्यात साठवणूक करून ठेवल्या प्रकरणी देखील या उद्योजकांवर तपासणी दरम्यान कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही कोट्यवधी ची उलाढाल असलेल्या उद्योजकांचे विशेष वजन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावर असल्याने या उद्योजकांच्या इतर प्रदूषणकारी कारखान्यांचे रासायनिक प्रदूषण उघड होऊन स्थानिक पातळीवर असलेल्या अधिकाऱ्यांनी कारवाई बाबत अहवाल प्रादेशिक अधिकारी ठाणे यांच्या कडे पाठवून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई आजवर झालेली नाही. यामुळे अशा प्रदूषणकारी कारखान्यांना पाठीशी घालून राष्ट्रीय हरित लवादाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांंवर कारवाई करण्याची मागणी जोरधरू लागली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील सत्तरबंगला भागातील युके ओरोमॅट्रिक प्लाँट नंबर एस 47 या नावाने असलेल्या रासायनिक कारखान्यातुन घातक रसायन चोरट्या पध्दतीने नाल्यात सोडले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. 23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी स्वतः या कारखान्यांची तपासणी केली होती. या कारखान्यांवर कारवाई बाबत अहवाल उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी दोन महिन्यांन पुर्वी प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांना पाठवले असताना देखील या कारखान्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. युके ओरोमॅट्रिक एस 47 या कारखान्याचा एक मालक हा आरती ड्रग्ज कारखान्यांच्या सोबत निगडित वरिष्ठ पदावर असुन आरती ड्रग्ज कारखान्यातुन निघणारे घातक टाकावु रसायन याठिकाणी प्रक्रिया करण्याच्या नावाखाली आणले जात असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तपासणी दरम्यान उघड झाले होते. महत्त्वाचे म्हणजे इतर एखाद्या कारखान्यांवर कारवाई करताना वेळेचा देखील विलंब न करता तातडीने कारखाना बंद ची कारवाई प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांच्या कडून केली जाते. असे असले तरी बड्या उद्योजकांंवर कारवाई साठी प्रादेशिक अधिकारी चालढकल करत असल्याचे दिसून येत आहे.
◾तारापूर मधील आरती ड्रग्स कारखान्यातील रसायन हे एस 47 या कारखान्यात रासायनिक प्रक्रिया करण्याच्या नावाखाली आणले जात होते. गेल्या अनेक वर्षांपासून हा चोरटा प्रकार सुरू होता. कारखान्यातुन निघणारे घातक रसायन विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधी रूपयाचा खर्च वर्षाकाठी येत असल्याने कारखानदारांने एस 47 याठिकाणी एक कारखाना घेवून त्याठिकाणी हे घातक रसायन थेट नाल्यात सोडले जात होते. महत्त्वाचे हे रसायन आरती ड्रग्स या कारखान्यांचे असल्याचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यांनी घटनास्थळी असताना सांगितले होते. मात्र या बड्या उद्योजकांचे आर्थिक वजन या अधिकाऱ्यांवर असल्याने यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत आहे.
◾ औद्योगिक क्षेत्रातील एन 198 या कारखान्याच्या भागात चोरट्या पध्दतीने घातक रसायन चोरट्या पध्दतीने सोडले जात असल्याचे काही दिवसांपूर्वी दिसून आले होते. याबाबत दबक्या आवाजात चर्चा असून याबाबत आपल्या कडे कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आला नसल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांन कडून सांगण्यात आल्याने स्थानिक स्थरावर हा विषय मार्गी लावला असल्याचे दिसून येते.
◾ युके ओरोमॅट्रिक कारखान्यातुन सोडण्यात आलेले रसायन याबाबत कारवाई बाबत अहवाल मुंबई मुख्य कार्यालयात पाठविण्यात आला आहे. आरती ड्रग्ज या कारखान्याची तपासणी करून सादर केलेल्या अहवालावर वरिष्ठ कार्यालयातुन आदेश प्राप्त झाल्यानंतर कारखान्यावर कारवाई केली जाईल.
— राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ठाणे