रब्बी हंगामातील तीन महिने टंचाईचे; शेतकऱ्यांमध्ये संताप
पालघर दर्पण: प्रतिनिधी
पालघर: डहाणू आणि तलासरी तालुक्यात रब्बी हंगामात युरिया खताचा तूटवडा निर्माण झाला आहे. मागील तीन महिन्यांपासून या परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकाऱ्यांकडून त्याचा तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये हा प्रत्यय येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे कृषीमंत्री असताना, जिल्हा कृषी विभागाची उदासीनता टीकेचा विषय बनला आहे.
पालघर जिल्ह्यात मागील खरिपातील भात पिकाचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील उत्पादनावर शेतकऱ्यांची भिस्त आहे. मात्र जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून खत विक्रेत्यांकडे युरिया खताचा साठा उपलब्ध नसल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागत आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात हिरवी व ढोबळी मिरची, वांगी, सफेद कांदा, भाजीपाला आणि वेलवर्गीय पिकांचे उत्पादन घेतले जाते. डहाणू तालुक्यातील वाणगाव आणि कासा कृषी मंडळात उन्हाळी भाताची लागवड केली जाते. सध्या भात रोपाणीच्या कामाची लगबग सुरू आहे. मात्र ऐन हंगामात आदिवासी शेतकऱ्यांना खतांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे.
एकीकडे शेतकऱ्यांचे विविध गट आणि पिकांचे क्लस्टर करण्यासाठी राज्यशासनाकडून शेतकऱ्यांना प्रोत्साहीत केले जाते. मात्र ऐन हंगामात पालघर जिल्ह्यात खतांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यात 17हजार टन युरियाचा पुरवठा झाल्याचे जिल्हा कृषी विभागाचे म्हणणे आहे. तीन महिन्यांपासून खत विक्रेत्यांना खताचा पूरवठा झाला नसल्याचे दुकानदारांचे म्हणने आहे. यामुळे हा खताचा साठा नेमका गेला कुठे याचा मागोवा जिल्हा प्रशासनाला लावणे गरजेचे आहे.