शिरीषपाडा येथील बांधकामांकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष
पालघर दर्पण: वार्ताहर
विक्रमगड: जमिनीचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत चालले असले तरी अघई रोडवर असलेल्या शिरीषपाडा नाका येथे महसूल विभागाच्या जागेत व्यापाऱ्यांनी अक्षरशः डल्ला मारलेला पाहायला मिळत आहे मात्र याकडे अनेकदा तक्रारी करूनही महसूल विभाग का दुर्लक्ष करते असा सवाल उपस्थित केला जात आहे. महसूल विभागाने तातडीने याबाबत धडक कारवाई करून अतिक्रमणे जमीनदोस्त करावीत व जागा मूळ मालकांना परत कराव्यात अशी मागणी केली जात आहे.
1943 साली महसूल विभागाने कोने ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शिरीषपाडा नाका येथील जागा येथील काही आदिवासी कुटुंबांना मिळकत म्हणून देऊ केली होती. महसूल विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांशी व्यापाऱ्यांनी गोडीगुलाबी करून या सरकारी जमिनींवर आपली दुकाने उभारली. आता या ठिकाणी अनेक दुकाने व घरे उभी राहिली असून रातोरात नवीन दुकाने उभारण्याची जणू स्पर्धा लागल्याचे पाहायला मिळते.
आदिवासींना नवीन शर्तीने लागवडीस दिलेल्या या जमिनींवर आता अनधिकृत बांधकामाचे पीक फोफावत असून तक्रारदारांना हे मस्तवाल व्यापारी धमक्या देतात असे तक्रारदार सांगतात. तर याबाबत वारंवार तक्रारी करूनही गोरगरीब आदिवासींच्या या तक्रारीना महसूल विभाग केराची टोपली दाखवितात असा आरोप केला जात आहे. दरम्यान महसूल विभागाच्या जागेवरील ही अतिक्रमणे तातडीने जमीनदोस्त असून जागा मूळ मालकांना देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
◾याबाबत नुकताच पंचनामे केले असून सुमारे 15 ते 20 दुकाने अनधिकृतपणे बसविण्यात आली आहेत ज्यात दोन मजली घराचाही समावेश आहे, अतिक्रमीत जागा ही महसूल सह वनविभाग व बांधकाम विभागाच्या जागेतही असावी ज्याची मोजणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र महसुल विभाग ही अतिक्रमणे काढण्याबाबत लवकरच ठोस निर्णय घेणार आहे.
–दत्ता डोईफोडे,
तलाठी, सजा कोने
◾अनेक वर्षांपासून ही जमीन आमच्या ताब्यात होती मात्र आमच्या घरातील कर्त्या पुरुषांच्या निधनानंतर व्यापाऱ्यांनी आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली, आज येथे अनेक व्यावसायिक बस्तान मांडून बसले असून रोज दुकाने वाढत आहेत ,महसूल विभाग चिरीमिरी घेऊन याकडे दुर्लक्ष करत असून आम्हाला आमची जमीन परत करून न्याय मिळावा.
— उज्वला डुकले,
स्थानिक तक्रारदार महिला