पालघर दर्पण: सचिन भोईर
विक्रमगड: एसटी महामंडळाचे वाडा आगार सातत्याने होत असलेल्या नुकसानीने आधीच त्रस्त असून जुनाट व सतत नादुरुस्त होत असलेल्या बस गाड्या या आगराच्या सेवेत अजून डोकेदुखी ठरली आहे. लांब पल्ल्याच्या वाहनांत येणारा बिघाड प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणारा असून याबाबत तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे अशी मागणी केली जात आहे.
वाडा ते अक्कलकुवा ही बससेवा अनेक दिवसांपासून सुरू असून एम.एच.14. बीटी.0253 या क्रमांकाची बस दोन दिवसांपूर्वी वाड्याच्या दिशेने येताना पुढील टायर फुटून नादुरुस्त झाली. चालकाच्या हुशारीने गाडीवर नियंत्रण मिळवता आले असून यातील 30 ते 35 प्रवाशी सुखरूप आहेत. मुळात फुटलेला टायर हा रिमोल्ड असल्याचे उजेडात आले असून 900 किमी अंतरावर जाऊन येणाऱ्या वाहनाला जुने टायर लावणे प्रवाशांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे असा आरोप केला जात आहे.
वाडा आगारात जवळपास 40 बसगाड्या असून यातील निम्मेच्या वर गाड्या 10 वर्षांच्या वर वयोमर्यादा असलेल्या व अगदी खिळखिळ्या झालेल्या आहेत. वाहनांना नवीन टायर ठाणे विभागातून अनेक महिन्यांपासून आले नसून बसच्या दुरुस्तीला लागणाऱ्या पार्टचीही कमतरता असते. अशा अनेक समस्यांमुळे वाहनांच्या दुरुस्तीत अडथळे येऊन याचा परिणाम सेवा देण्यावर निश्चित होतो असे येथील अधिकारी सांगतात.
याबाबत आम्ही काही चालकांना विचारले असता नोकरी करायची आहे म्हणून नादुरुस्त वाहनेही नाईलाजाने आम्हाला हाकावी लागतात शिवाय काही अपघात झाल्यास याचा ठपका मात्र आम्हाला येतो व अनेकदा आमच्यावर कारवाई केली जाते याबाबत ठोस कारवाई व्हायला हवी असे नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले.
◾प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असलेल्या एसटी महामंडळाने जुनाट, नादुरुस्त व किरकोळ दुरुस्त्या करून बसगाड्या रस्त्यावर चालविणे हे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणे असेच आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांना जुनाट गाड्या त्याही रिमोल्ड टायर लावून नेमक्या कुणाच्या आदेशाने व का चालविल्या जातात याचीही सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
◾अगदी लॉक डाउन पासून नवीन टायर आले नसल्याने गाड्या उभ्या ठेऊ शकत नाही म्हणून रिमोल्ड टायर वर गाडी पाठविण्यात आली आणि तिचा टायर वाटेत फुटला.घडलेल्या प्रकारात चालकाचा दोष नाही आणि आम्हाला गाड्या उभ्या करता येत नाही म्हणजे आमचाही दोष नाही. स्पेअरपार्टचा तुटवडा वरूनच असल्याने आमचा नाईलाज आहे.
— एम.आर.धांगडा, आगर व्यवस्थापक वाडा