सात वर्षांनंतरही काम अपुर्णच
पालघर दर्पण: रमेश पाटील
वाडा: तालुक्यातील गारगांव या आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळा इमारतीचे बांधकाम गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. मात्र अत्यंत कासव गतीने सुरु असलेले काम अजुनही अपुर्ण अवस्थेत राहिल्यामुळे येथील काही वर्ग शाळेच्या जुन्या इमारतींच्या व-हांड्यात भरण्याची वेळ येथील शिक्षकांवर आली आहे.
वाडा तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या गारगांव येथे गेल्या चाळीस वर्षांपासुन एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या जव्हार प्रकल्पाची शासकीय आश्रमशाळा आहे. पहिली पासून ते बारावी पर्यंतचे वर्ग असलेल्या या आश्रम शाळेत सहाशेहुन अधिक निवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सद्या येथील विद्यार्थी आश्रमशाळेच्या जुन्या इमारतीमधील खोल्यांमध्ये शाळेय वेळेत अध्यायनाचे धडे गिरवितात, तर अन्य वेळेत वर्ग खोल्यांमधील बाकडे बाहेर काढून याच वर्ग खोल्यांमध्ये निवासाची व्यवस्था करतात.
अपुऱ्या वर्ग खोल्या व विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन आदिवासी विभागाने तीन कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या वसतीगृहासाठी व आश्रमशाळेसाठी दोन भव्य इमारती बांधण्यासाठी घेतल्या आहेत. मात्र गेल्या सात वर्षांपासून या इमारतींचे बांधकाम कासव गतीने सुरु असल्याने येथील विद्यार्थ्यांना अपु-या जागेत शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत.
इमारत बांधकामाचा ठेका स्वस्तिक या बांधकाम कंपनीने घेतला असुन आदिवासी विभागाकडून झालेल्या कामांची देयके वेळोवेळी मिळत नसल्याने पुढील कामे रेंगाळत असल्याचे सांगितले. तर या इमारतीच्या बांधकामात ठेकेदाराकडूनच हलगर्जीपणा होत असल्याचे जव्हार प्रकल्पाचे बांधकाम विभागाचे उप अभियंता एस.बी.पाटील यांनी सांगितले.