पालघर दर्पण, प्रतिनिधी
मुंबई : कोव्हीड १९ या महामारीमुळे नागरिक त्रासलेले असून आता पेट्रोल व डिझेलच्या दर वाढल्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. महामारी, लॉकडाऊन यामुळे नागरिकांना आर्थिक चणचण भासत आहे. नागरिक कशीबशी आपली आर्थिक घडी बसवू पाहत आहेत. मात्र आता पेट्रोल व डिझेल दर वाढीमुळे आर्थिक घडी विस्कटून नागरिकांच्या डोक्याला ताण निर्माण होणार आहे. अनेकदा पेट्रोल व डिझेल दरात वाढ केंद्र सरकारमुळे की,राज्य सरकारमुळे नेटिझन्स ऑनलाईन भांडत असतात. मात्र यात सामान्य नागरिक चांगलाच भरडला जात आहे. यातच पेट्रोल व डिझेल दर वाढीमुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटर वरून निशाणा साधला आहे.
पेट्रोल व डिझेल दर वाढीवर राहूल गांधींनी शेर लिहून ट्विटर वर शेअर केला आहे. “वो जमलो का शोर मचाते है, हम सच का आईना दिखाते है असा हा शेर आहे. त्याच बरोबर त्यांनी जून २०१४ मध्ये मोदी सरकार पहिल्यांदाच सत्ता मध्ये आली तेव्हा कच्च्या तेलाची किंमत ग्लोबल मार्केटमध्ये ९३ डॉलर प्रति बॅरल होती. तर पेट्रोल ची किंमत ७१ रुपये व डिझेल ची किंमत ५७ रुपये पर्यंत होती. मात्र ७ वर्षा नंतर कच्च्या तेलाचा दर ३० डॉलर ने कमी झाला असून ६३ डॉलर प्रति बॅरल आहे. असे असले तरी पेट्रोल सेंच्युरी करत आहे तर त्या मागोमाग डिझेल देखील जात आहे. २०२१ मध्ये तेलाच्या किमती १९ वेळा वाढवल्या गेल्या. या दरम्यान पेट्रोल ५.२८ रुपये प्रति लिटर महागल आहे. १५ फेब्रुवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ या काळात पेट्रोल १७.०५ व डिझेल १४.५८ रुपयांनी महाग झालं आहे. असे ट्विट केले.