◾ तारापूर औद्योगिक क्षेत्रात टँकर माफियांचा सुळसुळाट; टँकर पाणीपुरवठा बंदी असल्याने रासायनिक टँकरचा पाण्यासाठी वापर करत माफियांनी लढवली शक्कल
पालघर दर्पण : हेमेंद्र पाटील
बोईसर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यात बेकायदेशीर पणे टँकरने पाणीपुरवठा केला जात असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे रासायनिक टँकरचा वापर पाणीपुरवठा करण्यासाठी केला जात असून टँकर माफियांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. औद्योगिक क्षेत्रात टँकरने पाणीपुरवठा करणे बंदी असताना देखील येथील कारखान्यात बेकायदेशीर पणे केला जाणारा पाणीपुरवठा यामुळे प्रदूषणात कधीकच वाढ झाली आहे.
औद्योगिक क्षेत्रातील सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रात रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने व या प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता कमी असल्याने औद्योगिक क्षेत्रात पाणी कपात करण्यात आली आहे. यातच महिनाभर सांडपाणी प्रक्रिया केंद्र देखील बंद असताना व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कारखान्यांचा पाण्याचा पुरवठा देखील बंद केला असताना देखील चोरट्या पध्दतीने काही कारखानदारांनी उत्पादन घेतले आहे. यातच रात्रीच्या वेळी येथील टँकर माफियांना पाणीपुरवठा करण्याचे काम येथील कारखानदार देतात. टँकर माफियांनी देखील शक्कल लढवत रासायनिक द्रव्य पुरवठा करणाऱ्या टँकर मध्ये पाणी भरून ते कारखान्यात पोचवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी चार टँकर काम करत असून औद्योगिक क्षेत्रालगत असलेला एका टँकर माफिया हे कामकाज करत आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाणीकपात केल्याचा दावा केला असला तरी कारखान्यांना पाण्याचा पुरवठा होतो कुठून याचा कधीही शोध घेतला जात नाही. जागरूक नागरीकांनी तक्रार केल्यानंतर तपासणी करणारे अधिकाऱ्यांनी एकाही टँकरवर आजवर ठोस कारवाई केली नाही. टाळेबंदीत बजाज हेल्थ केअर कारखान्यात असाच प्रकार उघडकीस आला होता. या कारखान्यात रासायनिक टँकर मधून पाणी पुरवठा केला जात असताना नागरिकांनी केलेल्या तक्रारी नंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. मात्र कारखान्याला फक्त नोटीस बजविण्यात अधिकाऱ्यांनी धन्यता मानली होती. यामुळे हाच टँकर माफियांने पुन्हा डोके वर काढले असून औद्योगिक क्षेत्रात नियमबाह्य पणे दररोज पाण्याचा पुरवठा केला जात असला तरी संबंधित विभाग मात्र त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.
◾महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने औद्योगिक क्षेत्रातील एन झोन मध्ये पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश दिले होते. याभागात होणारे सर्वात जात प्रदूषण यासाठी येथील पाणीपुरवठा मध्ये कपात देखील करण्यात आली होती. मात्र याच भागात असलेल्या अनेक कारखान्यात पाण्याचा बेकायदेशीर पुरवठा रासायनिक टँकर मधून होत असल्याने प्रदूषणाचा स्थर मात्र कमी झालेला दिसून आलेला नाही. याच भागात काही बड्या कारखान्यांच्या बाजूला देखील टँकर दिवसभर उभे राहिलेले दिसतात. तरीही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा कडून व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा कडून कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप अनेकदा होत आहे.
◾औद्योगिक क्षेत्रात टँकरने पाणीपुरठवा होऊ नये यासाठी रात्रीच्या वेळी पाणीपुरवठा कर्मचारी यांना देखरेखीसाठी ठेवण्यात आले आहे. टँँकरने पाणीपुरवठा असा प्रकार आढळून आल्यास कारवाई केली जाईल.
— राजेंद्र अनासने, उप अभियंता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाणीपुरवठा विभाग तारापूर