◾ दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी घरफोडी करून लाखोचा ऐवज केला लंपास
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: पालघर तालुक्यातील नागझरी येथे एका घराची घरफोडी झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या वेळी घडली आहे. घरातील व्यक्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल असल्याने बंद घराचा फायदा घेऊन चोरट्यांनी लाखोचा ऐवज लंपास केला आहे. मुख्य रस्त्यावरून चोरटे नागझरी गावात येत असतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोईसर पुर्वेकडे चिल्लार बोईसर मुख्य रस्त्यालगत नागझरी गाव असून याठिकाणी राहणारे रमेश अधिकारी यांचे राहते घर आहे. त्यांच्या पत्नीला काही महिन्यापूर्वी झालेल्या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने मुंबई येथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घरफोडी करत लाखोचा ऐवज लंपास केला आहे. नागझरी नाका येथून चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास नागझरी गावात दोन दुचाकीवरून प्रवेश केला त्याबाबत चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. यातच बाजूला असलेल्या घरांच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावून त्यांनी रमेश अधिकारी यांच्या घरांची कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील दोन्ही खोल्यांमध्ये असलेल्या कपाटे तोडून त्यामुळे असलेल्या सोन्याच्या बांगड्या, अंगठी, रोकड पैसे अशा प्रकारे 2 लाख 43 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
◾नागझरी नाक्यावर असलेली मनोर पोलीस ठाणे अंतर्गत येणारी पोलीस चौकी सदैव बंद असलेली दिसून येते. रात्रीच्या वेळी तर याठिकाणी एकही पोलीस उपस्थित नसतो. याभागात चोरीच्या घटना नेहमीच होत असताना देखील पोलीस अशा चोरीट्यांच्या मुसक्या आवळू शकले नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.