◾शिवसेनेचे वैभव संखे यांच्या मुलाच्या लग्नात हजारोची गर्दी; नियम धुडकावून केलेल्या लग्नात शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची उपस्थिती
पालघर दर्पण: हेमेंद्र पाटील
बोईसर: पालघर जिल्हाधिकारी यांच्या पथकाने करोनाचे निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्या लग्न सोहळ्यात दाड टाकून रविवारी पालघर तालुक्यातील काही ठिकाणी कारवाई केली. असे असताना काही मोठ्या राजकीय मंडळींकडे असणाऱ्या सोहळ्याकडे महसूल विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. बोईसर पुर्वेला एका पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्नात हजारो लोक उपस्थित होते. विशेष म्हणजे याठिकाणी शिवसेनेचे सचिव व खासदार उपस्थित असल्याने याठिकाणी कारवाई बाबत महसूल विभागाने पाठ फिरवली असल्याचे उघड झाले आहे.
करोना काळामध्ये लग्न समारंभ मध्ये 50 व्यक्तींचे निर्बंध राज्यशासनाने घातले होते. करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या समारंभांमध्ये करत असल्याची माहिती उपलब्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी सातपाटी, शिरगाव, उमरोळी येथील लग्न समारंभ येथे धाड टाकून कारवाई केली. प्रत्यक्षात पालघर तालुक्यात अनेक ठिकाणी लग्न समारंभ आयोजित करण्यात आले होते. मात्र मोजक्या ठिकाणी कारवाईचा बडगा उचलण्यात आला. यातच उमरोळी पासून काही अंतरावर असणाऱ्या बोईसर पुर्वेकडील खैरापाडा येथे असलेल्या इको इडन्टसिटी याठिकाणी शिवसेनेचे वैभव संखे यांच्या मुलाचा शाही थाटात लग्न समारंभ रविवारी आयोजित केला होता. त्याठिकाणी शिवसेना कार्यकर्ते, शिवसेना सचिव लोकसभा गटनेते खासदार विनायक राऊत व आमदार श्रीनिवास वणगा हे देखील उपस्थित होते. तसेच विविध राजकीय पक्षांतील मोठमोठ्या नेत्यांच्या वावर होता. या ठिकाणचे छायाचित्र समाज माध्यमांवर वायरल झाले असून सर्वसामान्य कुटुंबांवर कारवाई करणाऱ्या जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तसेच पालघर तहसीलदारांनी मोठ्या व राजकीय पार्श्वभूमीच्या लोकांकडे असणाऱ्या समारंभाकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात येते.
पालघर जिल्हाधिकारी यांनी करोना नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर संबंधित महसूल विभागाने व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विभागातील लग्नसोहळ्याची माहिती गोळा करून देणे अपेक्षित होतं. मात्र महसूल अधिकाऱ्यांची लागे बंदे असल्याने अनेक मोठे मासे कारवाईच्या जाळ्यातून सुटल्याचे दिसून येत आहे. यातच बोईसर येथे पारपडलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्नात ड्रोन कँमेराने देखील चित्रीकरण करण्यात आले असून ड्रोन उडविण्यासाठी बोईसर पोलीस ठाण्यातून परवानगी घेण्यात आली होती का हा प्रश्न देखील समोर येत आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना कायद्याचा बडगा दाखवून लग्न समारंभ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवणारे जिल्हाधिकारी आता बोईसर मधील शाही सोहळ्या कडे नेमके काय लक्ष देतात हे पाहावे लागणार आहे.
◾ सोशलमिडीयावर टाकलेले फोटो गायब
बोईसर पुर्वेला शिवसेना नेत्याच्या मुलाच्या लग्न समारंभाचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकण्यात आली होती. मात्र दुसऱ्या दिवशी पालघर मधील काही लग्न समारंभ वर कारवाई केल्याचे वृत्त पसरल्या नंतर तातडीने सर्व ठिकाणी टाकलेले लग्नांचे फोटो अचानक गायब झालेले दिसले. हजारोंच्या संख्येने लोक याठिकाणी उपस्थित होती. तसेच एकानेही तोंडावर माक्स लावलेला नव्हता. यामुळे करोनाचे निर्बंध धुडकावून शाही थाटामाटात लग्न समारंभ करणाऱ्या नेत्यांवर फौजदारी कारवाई महसूल विभाग करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
◾पालघर तहसील कार्यालयात लग्न सोहळा व इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी परवानगी घेण्यासाठी अधिकारी नेमण्यात आले असेल तरी त्यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांना परवानगी घेणे आयोजित विनापरवाना वेळ समारंभ सोहळे आयोजित करण्याचा प्रयत्न केल्याचे माहिती पुढे येत आहे. मुळात करोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर लग्न समारंभा मधील उपस्थिती वाढली होती व त्याबाबत सरकारी यंत्रणा देखील गाफील राहिली होती तलासरी येथील एका वरिष्ठ सदनी अधिकाऱ्यांच्या लग्नाला एक हजारहून अधिक नागरिक उपस्थित होते. तेव्हा जिल्ह्यातील मोठे पदाधिकारी देखील सहभागी झाल्याची माहिती पुढे आली आहे.