◾ मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संजीव जोशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न; अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी लावली हजेरी
पालघर दर्पण: विशेष प्रतिनिधी
बोईसर: पालघर जिल्ह्यातील अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या पालघर दर्पण वृत्तपत्रांचा प्रथम वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. करोना मुळे लागु असलेले निर्बंध यामुळे मोजक्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा झाला असून पत्रकार, शासकीय अधिकारी व सामाजिक क्षेत्रातील नामवंत लोकांनी यावेळी उपस्थित राहुन पालघर दर्पणच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
करोना काळात देखील वाचकांना योग्य बातम्या देण्यासाठी अविरत पणे सुरू राहिलेल्या पालघर दर्पण वृत्तपत्रांस 2 मार्च 2021 रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. पालघर दर्पणचा पहिला अंक प्रसिद्ध झाल्यानंतर काही काळाने देशभर टाळेबंदी लागु झाली होती. मात्र तरीही एकही दिवस वृत्तपत्र छपाईत खंड पडला नसून आजवर 52 अंक प्रसिद्ध झाले आहेत. अल्पावधीतच वाचकांच्या मनात घर केलेल्या निर्भीड बातम्या असलेल्या वृत्तपत्रास शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरांनी पालघर दर्पण कार्यालयात हजेरी लावली होती. मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संजीव जोशी यांच्या हस्ते पालघर दर्पणच्या दुसऱ्या वर्षात पदार्पण केलेल्या पहिल्या अंकाचे अनावरण झाले. यावेळी पालघर दर्पणचा वर्षभराचा कार्यकाळ व वर्षभरात उमटवलेला ठसा याबाबत संजीव जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्याच बरोबर जेष्ठ अच्युत पाटील व निरंजन राऊत यांनी देखील पालघर दर्पण विषयी बोलताना कौतुक करून सर्व मान्यवरांनी वृत्तपत्रात निर्भीडपणे अचूक येणाऱ्या बातम्या बाबत आपले मत मांडत पालघर दर्पणच्या कामाची पोचपावती दिली. पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष हर्षद पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
पालघर जिल्ह्यात करोना बाबत पुन्हा लागलेल्या निर्बंधामुळे थोडक्यात कार्यक्रम घेण्यात आला असला तरी जेष्ठ पत्रकार व नामांकित व्यक्तींनी कार्यक्रमाला लावलेली हजेरी यामुळे पालघर दर्पणचे अस्तित्व दिसून आले. यावेळी डॉ. हेमंत जोशी, बोईसर मंडळ अधिकारी मनिष वर्तक, तलाठी हितेश राऊत, संजय चुरी, पत्रकार दिनेश तारवी, सुनंदा खडपकर, विजय भोपडीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पालघर दर्पण वृत्तपत्रांस शुभेच्छा देण्यासाठी पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक विनोद अधिकारी यांनी देखील सदिच्छा भेट देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर उत्पादन शुल्क विभागाचे बोईसर निरिक्षक शैलेश शिंदे, उद्योजक कृष्णा देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य विणा देशमुख यांनी देखील कार्यालयात भेट देवून शुभेच्छा दिल्या आहेत. पालघर दर्पणचे संपादक हेमेंद्र पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून यापुढेही अशाच प्रकारे सहकार्य लाभावे अशी प्रमाणिक इच्छा व्यक्त केली.